अतिरेक्याचे गोव्यात प्रशिक्षण
By admin | Published: September 7, 2015 03:15 AM2015-09-07T03:15:48+5:302015-09-07T03:16:09+5:30
पणजी : इंडियन मुजाहिदीनचा (आयएम) खतरनाक अतिरेकी सईद इस्माईल अफाक याने गोव्यात पाच दिवस पॅराग्लायडिंगचे प्रशिक्षण घेतल्याचे
पणजी : इंडियन मुजाहिदीनचा (आयएम) खतरनाक अतिरेकी सईद इस्माईल अफाक याने गोव्यात पाच दिवस पॅराग्लायडिंगचे प्रशिक्षण घेतल्याचे त्याच्या चौकशीतून उघड झाले आहे. अफाकला ८ जानेवारी २०१५ मध्ये कर्नाटकमधील बंगळुरू येथे अटक करण्यात आली. सध्या तो बंगळुरू येथे कोठडीत आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने अफाकच्या केलेल्या चौकशीत त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले. बंगळुरू येथील प्रशिक्षकाकडून त्याने पाच दिवस पॅराग्लायडिंगचे प्रशिक्षण घेतल्याचे त्याने सांगितल्याचा उल्लेख ‘एनआयए’ या तपास संस्थेच्या आरोपपत्रात आहे.
गोव्यात पॅराग्लायडिंगचे प्रशिक्षण घेतल्यानंतर अफाकने अमेरिकेतून दोन पॅराग्लायडिंग किट्ससुद्धा खरेदी केली होती. परंतु त्यानंतर त्याने गोव्यात पुन्हा पॅराग्लायडिंग केले की नाही, याबद्दल ‘एनआयए’ला माहिती मिळाली नाही.
अतिरेकी त्रिकुटापैकी जानेवारीत अफाक आणि अबदस सबुर यांना बंगळुरू येथे अटक झाली होती. तर सद्दाम हुसेन यास कर्नाटकमधील भटकळ येथे अटक करण्यात आली होती. त्यानंतर ‘एनआयए’कडून त्यांची चौकशी सुरू झाल्यानंतर अफाकच्या गोव्यातील वास्तव्याबद्दल माहिती उघड झाली. संबंधित प्रकार उघड झाल्यानंतर पॅराग्लायडर्सवरही नजर ठेवण्याच्या सूचना राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आल्या आहेत. गोव्यात अतिरेकी येऊन पाच दिवस प्रशिक्षण घेऊन गेल्याचा ठावठिकाणा येथील पोलीस यंत्रणांना तर लागलाच नव्हता. एवढेच नव्हे तर त्याच्या प्रशिक्षकालाही त्याची कल्पना नव्हती, अशी माहिती ‘एनआयए’च्या सूत्रांकडून देण्यात आली.
दरम्यान, या सर्व घटनांमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झालेली आहे. असे असले तरीही सर्वच क्षेत्रांतील नागरिकांनी, विशेषत: गजबजलेल्या समुद्रकिनारी भागात विशेष दक्षता घेण्याची गरज आहे. अतिरेक्यांच्या यादीवर गोवा सॉफ्ट टार्गेट म्हणून ओळखला जातो. (प्रतिनिधी)