गोव्यातील किना-यांचा चेहरामोहरा बदलणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 11:58 AM2018-07-11T11:58:20+5:302018-07-11T11:58:30+5:30

पेडणे ते काणकोणपर्यंतच्या किना-यांच्या  विकासासाठी केंद्राकडून 100 कोटी रुपये 

The face of the Goa coast will change | गोव्यातील किना-यांचा चेहरामोहरा बदलणार 

गोव्यातील किना-यांचा चेहरामोहरा बदलणार 

Next

पणजी : पेडणे ते काणकोणपर्यंतच्या किना-यांच्या विकासासाठी केंद्र सरकारने 100 कोटी रुपये मंजूर केले आहेत. या किना-यांवर पायाभूत सुविधांचा दर्जा वाढविण्यासाठी विविध कामे केली जाणार असून किना-यांचा चेहरामोहराच बदलून टाकला जाईल. पर्यटनमंत्री मनोहर आजगांवकर यांनी ही माहिती दिली. कोलवा आणि  बाणावली किना-यावर नुकतेच १४ कोटी रुपये खर्चाच्या कामाची सुरवात झाली. कोलवा किना-याचा ‘आयकॉनिक बीच’ म्हणून विकास केला जाईल. चांगले रस्ते, पुरेसे पदपथ, प्रसाधनगृहे, कपडे बदलण्यासाठी खोल्या, ८0 कारगाड्यांसाठी तसेच ५४ बसगाड्या, ३२७ दुचाक्या यासाठी पार्किंगची सुविधा, मुलांना खेळण्यासाठी सोय, लँडस्के पिंग तसेच आकर्षक रोषणाई अशा विविध सुविधा येथे येतील. त्यासाठी ११ कोटी ६ लाख रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. बाणावली किना-यावरही १0२ चारचाकी तसेच १५२ दुचाक्या ठेवण्यासाठी पार्किंगची व्यवस्था केली जाईल. या तसेच इतर कामांसाठी २ कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. किनारपट्टी भागातील आमदार आणि संबंधित पंचायतींना विश्वासात घेऊनच किनारी विकास आखण्यात येईल. पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून ही कामे केली जातील.

दरम्यान, राज्यातील किनारे भिकारी, विक्रेते, ड्रग्स व्यवसाय यापासून मुक्त करण्यासाठी सरकार प्रयत्नरत असल्याचे ते म्हणाले. किनाºयांवर पर्यटकांना उपद्रव करणा-या फिरत्या विक्रेत्यांविरुद्ध कडक कारवाईची मोहीम सरकारने सुरु केली आहे. भादंसंच्या कलम ३४ खाली अशा उपद्रवकारी विक्रेत्यांना थेट अटक करुन तुरुंगात टाकले जाईल. पोलिसांना या कामी पर्यटन खात्याचे वॉर्डन तसेच सुपरवायझरही मदत करतील. किना-यांवरील शॅकमध्ये बाटल्यांचा वापर केला जाऊ नये. कॅनच वापरावेत, असा फतवा मध्यंतरी खात्याने काढला होता. किना-यांवर दारुच्या बाटल्या फोडून टाकण्याचे प्रकार घडतात. वाळूतून चालताना या बाटल्यांच्या काचा पायाला रुतण्याचा धोका असतो. किना-यांवर काचेच्या बाटल्यांचा वापर केला जाऊ नये यासाठी दंडाची तरतूद असलेले विधेयक लवकरच विधानसभेत आणले जाणार आहे. 

Web Title: The face of the Goa coast will change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.