लईराई देवीचा उद्या जत्रोत्सव; शिरगावसह परिसरात भक्तिमय वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 10:18 AM2023-04-23T10:18:21+5:302023-04-23T10:18:40+5:30
सोमवारी धोंड साकारणार भव्य अग्निदिव्य
लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव येथील श्री देवी लईराईच्या जत्रेनिमित्त राज्यात हजारो धोंड व्रत करीत आहेत. सोमवारी अग्निदिव्य होणार आहे. जत्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला आहे. पाच दिवस अस्नोडा ते शिरगाव रस्त्यावर मोठी फेरी भरते. लाखोंची उलाढाल या पाच दिवसांत होत असते.
शिरगावात ग्रामस्थ तयारीत मग्न आहेत. रंगरंगोटी, सजावट, कमानी उभारणे, विद्युत रोषणाईची कामे पूर्ण झाली आहेत. या ठिकाणी भुयारी वीजवाहिन्या घालण्याचे काम पूर्ण होऊन त्याचे उद्घाटन आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. तसेच खोदलेले रस्ते हॉट मिक्स डांबरीकरणे करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
होमकुंड रचण्याचे काम पूर्ण झाले आहे. हजारो धोंड विविध भागांत व्रत करून देवीची सेवा करतात. परदेशातही राज्यातील धोंड कामानिमित्त आहेत तेही त्या ठिकाणी व्रत करतात. पाच व तीन दिवस स्वतंत्र व सोवळ्यात राहून दिवसाकाठी किमान दहावेळा स्नान करून फराळ करणे तसेच समूहाने राहून देवीची सेवा करणे हा अनुभव विलक्षण असल्याचे धानो गावकर यांनी सांगितले.
प्रशासनाने उत्सवासाठी सर्व ती तयारी पूर्ण केली आहे. देवस्थान समिती ही अनेक बाबतीत कार्यरत असून, लाखो भाविकांची गर्दी होत असल्याने वाहतूक व पार्किंग सुविधा, भाविकांना दर्शन घेण्याची योग्य व्यवस्था केली आहे. भाविकांनी सर्व सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष गणेश गावकर यांनी केले आहे. मोगरीच्या कळ्यांची जत्रेत मोठी मागणी असल्याने गोवा व इतर भागांतून मोठ्या प्रमाणात लोक विक्रीसाठी येत असतात. ही जत्रा प्रत्येकाच्या जिवाभावाचा उत्सव असतो. त्यामुळे सारे लोक या जत्रेला गर्दी करतात.
प्लॅस्टिकमुक्ती....
शनिवारी मामलेदार राजाराम परब यांनी शिरगावात भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. भाविकांनी शिस्तीचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. येथील प्राथमिक शाळेच्या मुलांनी कागदी पिशव्या तयार करून जत्रेत प्लॅस्टिकमुक्तीचा संदेश देण्याचे काम सुरु केले आहे.
गोबी मन्चुरीयनवर बंदी
तळीचे सुशोभीकरण करण्यात आल्याने धोंडांची खूप चांगली सोय होणार आहे. या व्रतात लहानांपासून अगदी ९० वर्षे वयोगटातील धोंड सहभागी होतात. अनेक युवती महिला अग्निदिव्य साकारतात. यावर्षी गोबी मन्चुरीयनला बंदी घालण्यात आलेली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"