ह. मो. मराठे यांचे गोव्याशी कायम ऋणानुबंध
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2017 12:12 PM2017-10-02T12:12:41+5:302017-10-02T12:14:06+5:30
महाराष्ट्रातील मराठी वाचकांमधील लोकप्रिय लेखक ह. मो. मराठे यांच्या निधनाच्या वृत्ताने गोव्यातही अनेकांच्या मनात मराठे यांच्याविषयीच्या आठवणी तीव्रतेने जाग्या झाल्या आहेत.
सदगुरू पाटील/पणजी : महाराष्ट्रातील मराठी वाचकांमधील लोकप्रिय लेखक ह. मो. मराठे यांच्या निधनाच्या वृत्ताने गोव्यातही अनेकांच्या मनात मराठे यांच्याविषयीच्या आठवणी तीव्रतेने जाग्या झाल्या आहेत. जन्माने गोमंतकीय असलेल्या मराठे यांनी आपले गोव्याशी असलेले ऋणानुबंध आणि वेगळे नाते कायम जपले. 'लोकमत'शी सोमवारी बोलताना माजी केंद्रीय मंत्री तथा कोकण मराठी परिषदेच्या गोवा शाखेचे सल्लागार माकांत खलप यांनी काही हृद्य आठवणींना उजाळा दिला. माजी मंत्री व मराठी साहित्यरसिक प्रकाश वेळीप यांच्याही मनात मराठे यांच्याविषयीच्या आठवणी दाटून आल्या.
गोव्यातील अनेक कलाकार, संगीत, नाट्य व साहित्य क्षेत्रातील मान्यवर हे महाराष्ट्रात जाऊन स्थायिक झाल्यानंतर मोठे झाले. काही लेखकांनी बालपणीच गोवा सोडला. मराठे यांचा समावेशही अशाच लेखकांमध्ये होतो. मराठे यांचा जन्म गोव्यातील सुर्ल-साखळी येथे झाला. घरची अत्यंत गरिबी त्यांनी बालपणी गोव्यात अनुभवली. त्यांच्या गाजलेल्या 'बालकाण्ड' या आत्मकथनात हा भाग आलेला आहे.
गोमंतकीयांना मराठे यांच्याविषयी विशेष ममत्व होते. मराठे हे आपल्या गोव्याचे आहेत,अशी अभिमानाची भावना गोव्यातील साहित्यप्रेमींमध्ये कायम राहिली. त्यामुळेच गोवा कोकण मराठी परिषद आणि गोमंतक मराठी अकादमीने मराठे यांना काही वर्षांपूर्वी गोव्यात बोलावून त्यांच्या सुर्ल ह्या मूळगावी त्यांचा गौरव केला होता. मराठे त्यावेळी भावूक बनले होते. काहीजणांना तत्पूर्वी मराठे हे गोमंतकीय आहेत याची कल्पनाही नव्हती. मराठे यांच्या बालकाण्डवर जाहीर चर्चेचा कार्यक्रमही गोमंतकीय साहित्यप्रेमींनी त्यांच्या सुर्ल गावी घडवून आणला होता. रमाकांत खलप हे त्याप्रसंगी कोकण मराठी परिषदेच्या गोवा शाखेचे अध्यक्ष होते. मराठे यांचे काही नातेवाईक गोव्यात आहेत.
दरम्यान खलप म्हणाले की मराठे यांच्याशी गोमंतकीयांचे सलोख्याचे नाते कायम राहिले. आपले अधूनमधून त्यांच्याशी बोलणेही व्हायचे. उच्चवर्णीय म्हणजे सधन असतात असा एक समज आहे पण मराठे हे जन्माने उच्चवर्णीय असले तरी बालपणी त्यांच्या वाट्याला मोठे दारिद्र्य आले. बालकाण्ड ही अजरामर साहित्यकृती त्या अनुभवातून साकारली. मराठे यांच्या निधनामुळे प्रतिभावान साहित्यिकाला आम्ही मुकलो असे खलप म्हणाले. कोकण मराठी परिषद गोवातर्फे मराठे यांना श्रद्धांजली असे खलप म्हणाले.
गोव्यातील केपे येथे 15 वर्षांपूर्वी झालेल्या गोवा मराठी साहित्य संमेलनाचे मराठे हे अध्यक्ष होते. माजी मंत्री प्रकाश वेळीप हे त्या संमेलनातील आयोजकांमधील प्रमुख होते. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या संमेलनाचे उद्घाटन केले होते. वेळीप यांनीही सोमवारी 'लोकमत'शी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. तीन दिवस आम्ही त्यावेळी मराठे यांच्या सहवासात होतो. गुणी लेखकाला मुकल्याबाबत वाईट वाटते, असे वेळीप म्हणाले.