शेतकऱ्यांनी रोखला राष्ट्रीय महामार्ग; आंदोलनकर्त्यांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 04:26 PM2023-07-18T16:26:45+5:302023-07-18T16:27:38+5:30

संजीवनी कारखानाप्रश्नी तीव्र आंदोलन सुरू

farmers block national highway protesters arrested | शेतकऱ्यांनी रोखला राष्ट्रीय महामार्ग; आंदोलनकर्त्यांना अटक 

शेतकऱ्यांनी रोखला राष्ट्रीय महामार्ग; आंदोलनकर्त्यांना अटक 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, उसगाव : संजीवनी साखर कारखान्यात इथेनॉल प्रकल्प सुरू होणार की नाही यासंदर्भात सरकारने धोरण स्पष्ट करावे. जोपर्यंत सरकार धोरण स्पष्ट करीत नाही, तोपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा देत सुमारे १३० शेतकऱ्यांनी गोमंतक ऊस उत्पादक शेतकरी संघटनेच्या बॅनरखाली धरणे आंदोलन केले. 

दयानंदनगर- धारबांदोडा येथील संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सोमवारी सकाळी हे आंदोलन करण्यात आले. दुपारी पावणेचारच्या सुमारास शेतकऱ्यांनी पणजी बेळगाव राष्ट्रीय महामार्ग - मार्गावरील वाहतूक रोखून धरली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली.

संजीवनी साखर कारखान्यात इथेनॉल प्रकल्प सुरू होणार की नाही यासंदर्भात सरकारने दुपारपर्यंत धोरण स्पष्ट करावे, अन्यथा राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येईल असा इशारा गोमंतक ऊस उत्पादक शेतकरी संघटनेने दिला होता. सकाळी गोमंतक ऊस उत्पादक शेतकरी संघटनेची साखर कारखान्याच्या परिषद सभागृहात बैठक घेण्यात आली. 

बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई होते. संघटनेचे पदाधिकारी हर्षद प्रभू-देसाई, दयानंद फळदेसाई, गुरुदास गाड, दामोदर गवळी, खुशाली मामलेकर, कृष्णा गाडगीळ, फ्रान्सिस मस्कारेन्हास व इतर सभासद उपस्थित होते. त्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला.

परंतु शेतकऱ्यांना सरकारकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दुपारी ३.३० वाजता शेतकऱ्यांनी साखर कारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळून राष्ट्रीय महामार्गावर सरकार विरोधी घोषणा देत मोर्चा काढला. पावणेचार वाजल्यानंतर सुमारे अर्धा तास पणजी बेळगाव महामार्गावरील वाहतूक रोखून धरली. 

धारबांदोड्याचे उपजिल्हाधिकारी निलेश धायगोडकर यांनी आंदोलक शेतकऱ्यांना महामार्ग वाहतुकीला खुला करण्याचे आवाहन केले. मामलेदार लक्ष्मीकांत कुकर, पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर उपस्थित होते. गोमंतक ऊस उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी महामार्गावरून हटण्यास नकार देत मागण्या पूर्ण करण्याचा आग्रह धरला. पोलिस अधिकाऱ्यांनी अर्धा तास वाट पाहून आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्यांना कुळे पोलिस स्थानकात नेण्यात आले.. यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

आता कुळेत ठिय्या आंदोलन

दरम्यान, सरकारकडून मागण्या पूर्ण होईपर्यंत आता कुळे पोलिस स्थानकात ठाण मांडून बसू, इथेनॉल प्रकल्प सुरु करण्यासंदर्भात सरकारने धोरण लेखी स्पष्ट करेपर्यंत ऊस उत्पादक शेतकरी कुळे पोलिस स्थानकातून हटणार नाहीत, अशी माहिती गोमंतक ऊस उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी अटकेनंतर दिली.

पोलिसांकडून खबरदारी

सरकारी पातळीवर वरिष्ठ अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांनी हे आंदोलन हाताळताना खबरदारी घेतली. सहबागी वृद्ध महिला व पुरुष आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले नाही. त्यांना सुखरूप घरी जाण्यास दिले. आंदोलकांना ताब्यात घेवून कुळे पोलिस स्थानकात नेण्यासाठी पोलिस मिनीबस, ४ पोलिस रॉबर्ट कार, उपजिल्हाधिकाऱ्यांची जीप आदी वाहनांचा वापर करण्यात आला. आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.


 

Web Title: farmers block national highway protesters arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.