गोव्यात भाजपाच्या खासदारांचे उपोषण, कार्यकर्तेही सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 07:48 PM2018-04-12T19:48:57+5:302018-04-12T19:48:57+5:30
संसेदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गोंधळ माजवून काँग्रेसी खासदारांनी कामकाज बंद पाडल्याच्या निषेधार्थ गोव्यातही पक्षाच्या तिन्ही खासदारांनी दिवसभर उपोषण केले.
पणजी : संसेदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गोंधळ माजवून काँग्रेसी खासदारांनी कामकाज बंद पाडल्याच्या निषेधार्थ गोव्यातही पक्षाच्या तिन्ही खासदारांनी दिवसभर उपोषण केले.
आझाद मैदानावर झालेल्या या उपोषणाच्या कार्यक्रमात खासदारांबरोबर शंभरेक कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते. पालिकामंत्री फ्र ान्सिस डिसोझा, वीजमंत्री पांडुरंग मडकईकर, आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनीही उपस्थिती लावून पाठिंबा दर्शविला.
काँग्रेसचे अलोकशाही वर्तन : श्रीपाद
याप्रसंगी बोलताना केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी काँग्रेसी खासदारांनी अलोकशाही वर्तन चालवले असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, ‘देश स्वतंत्र होऊन ७0 वर्षे उलटली. देशात आजवर सर्वात जास्त सत्ता काँग्रेसचीच होती तर मग या देशाचा विकास का झाला नाही, असा सवाल त्यांनी केला. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात २३ दिवस गोंधळ घालून काँग्रेसी खासदारांनी कामकाज बंद पाडले. सभापतींनी सजम देऊनही त्यांचे काही ऐकले नाही. एकेका राज्यात सत्तेपासून दूर होतोय याचे शल्य काँग्रेसला असून त्याच वैफल्यग्रस्ततेतून या गोष्टी घडत आहेत.’
गोव्यात काँग्रेसने सत्तेची स्वप्ने पाहू नयेत : तेंडुलकर
भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलक र यांनी ‘गोव्यात काँग्रेसने सत्तेची स्वप्ने पाहू नयेत, असे नमूद केले. २0१७ च्या निवडणुकीत संधीचे सोने करण्यास काँग्रेसला अपयश आले. उलट नंतर त्यांचा एक आमदारही कमी झाला, असे ते म्हणाले. देशभरात काँग्रेसची पीछेहाट चालली आहे त्यामुळे पक्षाचे आमदार, खासदार वैफल्यग्रस्त बनले आहेत, अशी टीका त्यांनी केली. पर्रीकरांच्या अनुपस्थितीत प्रशासन ढेपाळल्याची जो आरोप होत आहे तो तेंडुलकर यांनी फेटाळून लावला. सरकार चांगल्या पध्दतीने चालले आहे. तीन मंत्र्यांची मंत्रिमंडळ सल्लागार समिती प्रशासन चालवत आहे, असे ते म्हणाले.
दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर यांनी काँग्रेस समाजात फूट घालत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, ‘तब्बल २२ राज्यांमध्ये भाजप सत्तेत आहे ते काँग्रेसला बघवत नाही. संसदेत दीड तास काँग्रेसी खासदारांनी गोंधळ घातला परंतु विकास आणि जन कल्याणाचा ध्यास घेतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न डगमगता आपले भाषण चालूच ठेवले. केंद्र सरकारने लोकांना अनेक योजना दिल्या. मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी ५६ हजार कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली. काँग्रेस या सर्व चांगल्या गोष्टींना अपशकून करण्याचा प्रयत्न केला आहे.’
काही आमदारांची अनुपस्थिती
काही आमदारांची अनुस्थिती दिसून आली. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, महादेव नाईक, आमदार निलेश काब्राल, आमदार एलिना साल्ढाना, माजी आमदार किरण कांदोळकर, उत्तर जिल्हा पंचायत अध्यक्ष अंकिता नावेलकर, आमदार ग्लेन तिकलो, दामू नाईक, सदानंद तानावडे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी काँग्रेस विरोधात घोषणाही दिल्या.
दरम्यान, सायंकाळी ५ वाजता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. अविनाश धाकणकर यांच्या हस्ते तिन्ही खासदारांना लिंबू सरबत देऊन हे उपोषण समाप्त करण्यात आले.