गोव्यातील अपघाती मृत्यूचे प्रमाण 2018 मध्ये 22 टक्क्यांनी घटले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2019 03:22 PM2019-01-05T15:22:23+5:302019-01-05T15:24:48+5:30
2017 च्या तुलनेत सरलेले 2018 हे वर्ष गोव्यासाठी राजकीय अस्थिरतेचे ठरले. तरी वाहतुकीच्या दृष्टीने हे वर्ष चांगलेच गेले असे म्हणावे लागेल. 2017 च्या तुलनेत मागच्या वर्षी रस्त्यावरील अपघाती मृत्यूच्या संख्येत 22 टक्क्यांनी घट झाली.
सुशांत कुंकळयेकर
मडगाव : 2017 च्या तुलनेत सरलेले 2018 हे वर्ष गोव्यासाठी राजकीय अस्थिरतेचे ठरले. तरी वाहतुकीच्या दृष्टीने हे वर्ष चांगलेच गेले असे म्हणावे लागेल. 2017 च्या तुलनेत मागच्या वर्षी रस्त्यावरील अपघाती मृत्यूच्या संख्येत 22 टक्क्यांनी घट झाली असून सध्या जी उपाययोजना हाती घेतली आहे ती पाहिल्यास चालू वर्षात हे प्रमाण आणखी दहा ते 15 टक्क्यांनी खाली येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
2017 साली गोव्यात रस्त्यावरील अपघाताचे बळी 328 होते. 2018 साली हे प्रमाण 73 मृत्यूंनी कमी झाले. मागच्या वर्षी एकूण 255 जणांना रस्त्यावर मृत्यू आला. वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी केल्यामुळे तसेच लोकांमध्ये जागृती केल्यामुळेच हे प्रमाण कमी झाल्याचे गोव्याचे पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी सांगितले.
2018 साली गोव्यात 241 अपघातात लोकांना मृत्यू आले असून त्यापैकी 223 अपघात गंभीर स्वरुपाचे होते. या व्यतिरिक्त 827 अपघात किरकोळ स्वरुपाचे असून आतापर्यंत अपघातात जखमी होणाऱ्यांची संख्या एक हजारापेक्षा जास्त झाली आहे. एकाबाजुने अपघाती मृत्यूची संख्या खाली उतरलेली असताना वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाण मागच्या वर्षी 46 टक्क्यांनी वाढले. मुक्तेश चंदर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 2017 साली अपघाती मृत्यू आलेल्यामध्ये 70 टक्के दुचाकीस्वार होते. 2018 मध्येही दुचाकीस्वारांचा अधिक मृत्यू झाला. मात्र हे प्रमाण 2017 च्या तुलनेत बरेच कमी आहे.
अपघातावर नियंत्रण आणण्यामध्ये वेगवेगळ्या घटकांचा सहयोग अपेक्षित असतो. यामुळेच आम्ही वाहन चालकांना शिस्त यावी यासाठी जागृतीचे कार्यक्रम आयोजीत केले होते. त्याशिवाय नियम उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईही केली होती. काही ठिकाणी अपघात होण्यामागे रस्त्यांची रचना कारणीभूत असल्याचे लक्षात आल्यामुळे या रस्त्यांमध्ये सुधारणा करावी यासाठी वाहतूक पोलीस विभागाने सार्वजनिक बांधकाम खात्याला कळविले आहे.
यंदा पहिल्या चार दिवसांतच सहा बळी
2017 च्या तुलनेत 2018 साल अपघाती मृत्यूच्या दृष्टीने चांगले गेले असले तरी 2019 सालाचा पहिला आठवडा मात्र जीवघेणाच ठरला. पहिल्या चार दिवसांतच एकूण सहा जणांचे बळी गेले असून त्यापैकी पाच जण दुचाकी अपघातात ठार झाले आहेत. यंदाचे न्यू ईयर अपघाताविना पार पडले हा पोलिसांना झालेला आनंद त्यामुळे क्षणभंगूर ठरला आहे. जानेवारीच्या 1 तारखेला वास्को परिसरात दोन बळी गेले. त्यात साकवाळ येथे दीपाली भट (29) या युवतीचा तर न्यू वाडे येथील दादापीर बोनीकप्पा या 53 वर्षीय इसमाचा समावेश होता. 2 जानेवारी रोजी बेतूल येथे गाडी उलटून ज्यॉएल फर्नाडिस या 18 वर्षीय युवकाला मृत्यू आला. तर 3 जानेवारी रोजी सुरावली येथे झालेल्या दुचाकी अपघातात ज्यॉएल फर्नाडिस (22) या मडगावच्या युवकाला मृत्यू आला होता. 4 जानेवारी रोजी उत्तर गोव्यात हडफडे येथे झालेल्या अपघातात इम्रान मोंडाल आणि सुरेंद्र सिंग या दोघांना दुचाकी अपघातात मरण आले. यातील नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे हे सहाही अपघातात स्वयं अपघात या कक्षेत मोडणारे होते.