सारीपाट: छोट्या पक्षांचे भवितव्य ठरेल 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 10:14 AM2023-04-23T10:14:08+5:302023-04-23T10:15:41+5:30

देशातील छोटे पक्ष स्वत:च्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत. भाजपसोबत राहणारे व भाजपच्या विरोधात लढणारे अशा दोन्ही प्रकारच्या छोट्या पक्षांची यावेळी मोठी कसोटी आहे. गोव्यातही तोच अनुभव आहे. निवडणूक जवळ आली की, चित्र अधिक स्पष्ट होईल.

fate of small parties will be determined in lok sabha election 2024 | सारीपाट: छोट्या पक्षांचे भवितव्य ठरेल 

सारीपाट: छोट्या पक्षांचे भवितव्य ठरेल 

googlenewsNext

- सद्गुरु पाटील

एप्रिल-मे २०१९ या कालावधीत देशात लोकसभानिवडणूक झाली होती. ११ एप्रिल ते १९ मे या कालावधीत सात टप्प्यांमध्ये ती निवडणूक झाली होती. आता पुढील वर्षभरात २०२४ ची लोकसभा निवडणूक होणार आहे. प्रत्येक सार्वत्रिक निवडणूक ही देशाचे भवितव्य ठरवत असतेच. मात्र यावेळची निवडणूक देशवासियांसोबतच छोट्या पक्षांचे व विशेषतः प्रादेशिक पक्षांचे भवितव्य ठरवणार आहे. प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व राहणार की नाही हे यावेळी लोकसभा निवडणूक ठरवील. अगदी अलिकडेच केंद्रीय निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का दिला आहे. या दोन्ही पक्षांना राष्ट्रीय पक्ष म्हणून जी मान्यता होती ती आयोगाने मागे घेतली आहे. गुजरातमध्ये पाच जागा जिंकल्याने आम केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा स्टेटस मिळाला आहे. आम आदमी पक्षाचे हे मोठे यश आहे.

पवार व ममता बॅनर्जी या दोघांनाही आपण पंतप्रधान व्हायला हवे असे वाटते, पण दोन्ही नेत्यांच्या पक्षांनी राष्ट्रीय पक्ष म्हणून स्टेटस गमावले आहे. सीपीआयचीही राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता गेली. देशातील अधिकाधिक राजकीय पक्ष पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्या वळचणीला जाऊ पाहतात. भाजपच्या आश्रयाला अधिकाधिक पक्ष जाऊ पाहत असताना काही पक्ष मात्र सत्ताधाऱ्यांविरुद्ध संघर्ष करत आहेत. त्यात आम आदमी पक्ष, उद्धव ठाकरे यांची सेना, नितीश कुमार, तेजस्वी यादव यांचे पक्ष आदींचा समावेश होतो. भाजपसोबत राहिलेले पक्ष वरवर सुखी आहेत. निदान त्यांच्यामागे केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीचा ससेमीरा तरी नाही. काही पक्ष भाजपसोबत राहून स्वतःचा प्रभाव मर्यादित करत आहेत तर काही पक्ष भाजपविरुद्ध लढून स्वतःचे अस्तित्व संपवत आहेत.

गोव्यातील म.गो. पक्ष, गोवा फॉरवर्ड पक्ष हे याचे उत्तम उदाहरण आहे. मगो पक्ष भाजपविरुद्ध संघर्ष करू शकत नाही. तो पक्ष संघर्ष करायला गेला तरी संपेल. तूर्त भाजपसोबत सत्तेत राहून सुदिन ढवळीकर मंत्रीपद अनुभवत आहेत. त्याबाबत ते सुखी आहेत. विजय सरदेसाई यांचा गोवा फॉरवर्ड पक्ष धड काँग्रेससोबतही नाही आणि भाजपसोबतही नाही. तो पक्ष मध्येच आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना मात्र विजयच्या पक्षाने आपला क्रमांक एकचा शत्रू मानले आहे. गोवा फॉरवर्ड पक्ष भाजपच्या केंद्रीय नेत्यांना टार्गेट करत नाही. त्या पक्षाला भाजपचे स्थानिक नेतृत्व नको आहे. फॉरवर्ड पक्ष भाजपसोबत सत्तेत नाही. विधानसभा अधिवेशन सुरू असते तेव्हा कॉंग्रेसच्या नेत्यांपेक्षा फॉरवर्डचेच नेते सरदेसाई सावंत सरकारला जास्त घाम काढतात हे मान्य करावे लागेल. सरदेसाई यांच्याकडे उत्तम वक्तृत्व आहे. प्रभावी भाषाशैली आहे. विषयांचा अभ्यास आहे. मात्र सरदेसाई आपला पक्ष गोव्यात वाढवू शकले नाहीत. सुदिन सध्याच्या स्थितीत मगो पक्ष वाढवू शकत नाहीत. गेल्या रविवारी तर त्यांना अमित शाह यांच्या सभेवेळी भाजपच्या नेत्यांसोबत व्यासपीठावर चढावे लागले.

येत्या लोकसभा निवडणुकीत मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सर्व शक्ती वापरणार आहे. सर्वाधिक कार्यकर्ते आणि सर्वाधिक धन असलेला पक्ष म्हणून आज भाजपचीच ओळख आहे. शिवाय माहिती तंत्रज्ञानाचा व सोशल मीडियाशी निगडित सर्व आयुधांचा सर्वाधिक प्रभावी वापर भाजपच करत आहे. राहुल गांधी यांच्या कांग्रेसला हे जमलेले नाही, भाजपपेक्षा काँग्रेस खूप मागे आहे. काँग्रेस पक्ष स्वतःची सदस्य नोंदणी मोहीमदेखील नीट राबवू शकत नाही. राहुल गांधी यांची यात्रा यशस्वी ठरली होती. मात्र त्यानंतर गांधी यांनी सेल्फ गोल केले आहेत. वीर सावरकर यांच्या विषयावर राहुल गांधी यांनी केलेला वाद काँग्रेसचेच नुकसान करणारा ठरला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विविध राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष आणखी फुटेल असे दिसते. राजस्थानमध्ये सचिन पायलट यांची घुसमट आणि धुमशान कसे सुरू आहे ते पूर्ण देश पाहातो आहे.

गोव्यातील रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाने कॉंग्रेस, भाजप, आम आदमी अशा सर्वच पक्षांना आपले शत्रू मानले आहे. आपण आपली वेगळी वाट चालणार असे आरजीने ठरवले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत १० टक्के मते मिळवणारा आणि एक मतदारसंघ जिंकणारा आरजी पक्ष आता प्रथमच लोकसभा निवडणूक लढवणार आहे. मनोज परब यांनी तसे जाहीर केले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर व दक्षिण गोव्यात आरजीला प्रभावी उमेदवार मिळाले तर निश्चितच लढत रंगणार आहे. युवा मतदारांमध्ये आरजीचे फॉलोअर्स खूप आहेत. आम आदमी पक्षदेखील उमेदवार उभे करीलच. तृणमूल काँग्रेस पक्षही लुडबूड करण्याच्या हेतुने आपले उमेदवार दोन्ही जागांवर उभे करू शकतो.

भाजपकडे गोव्यात यावेळी सर्वाधिक आमदार आहेत. शिवाय मगो आणि अपक्ष आमदार सोबत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली उत्तरेची जागा जिंकणे हे भाजपला कधी आव्हानात्मक वाटतच नाही. उत्तर गोव्यात भाजप सुरक्षित आहे. हैं मान्य करावे लागेल. दक्षिण गोवा मतदारसंघातच यावेळी खरी लढत असेल, काँग्रेसचे खासदार फ्रान्सिस सार्दिन थकले आहेत. सार्दिन यांना तिकीट नाकारणे हाच काँग्रेसचा शहाणपणा ठरेल. काँग्रेसला दक्षिणेत नवा उमेदवार निवडावाच लागेल. भाजपनेदेखील दक्षिण गोव्यात आपला उमेदवार कोण असेल ते ठरवलेले नाही. भाजपचे कार्यकर्तेही द्विधा मन:स्थितीत आहेत. यावेळी भाजपमध्ये तिकिटासाठी इच्छुक खूप आहेत. दक्षिण गोव्यात काँग्रेसची मते जास्त आहेत हे मान्य केले, तरी पूर्वी दक्षिणेत दोनवेळा भाजप जिंकलाय हेही तेवढेच खरे आहे. ख्रिस्तीधर्मिय मतदारांच्या जास्त जवळ जाण्याची चाल सध्या भाजप सगळीकडेच खेळत आहे. दक्षिण गोव्यातील खिस्ती मतदार भाजपला किती साथ देतील ते पाहणे महत्त्वाचे ठरेल. शाह यांच्या फर्मागुडीत झालेल्या सभेला जास्त ख्रिस्ती प्रेक्षक नव्हते. सभेसाठी हिंदू मतदार आणि ते देखील उत्तर गोव्यातून जास्त आणले गेले होते. आमदार आता अल्पसंख्याक मतदारांसाठी पूर्वीसारखा अस्पृश्य राहिलेला नाही. मुस्लिम व खिस्ती मतदार भाजपच्या आणखी जवळ येऊ शकतात. मात्र काँग्रेस पक्ष दक्षिण गोव्यात कुणाला तिकीट देतो यावरही बरेच काही अवलंबून असेल.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी दक्षिण गोव्यात भाजपकडे जास्त आमदार नव्हते. आता आलेक्स रेजिनाल्डपासून सुदिन ढवळीकर आणि दिगंबर कामतपासून संकल्प आमोणकर, आंतोन वाज असे सगळेच भाजप सरकारसोबत आहेत. काहीजण भाजपचेच आमदार आहेत. नीलेश काढाल, रमेश तवडकर, गणेश गावकर आदी नेते सक्रिय आहेत. शिवाय पराभूत झाले तरी बाबू कवळेकर, बाबू आजगावकर, क्लाफास डायस आदी भाजपसोबत आहेत. युरी आलेमान, केपेचे एल्टन हे लोकसभा निवडणुकीवेळी किती गंभीरपणे काँग्रेसचे काम करतील तेही पाहावे लागेल, विजय सरदेसाई यांचा गोवा फॉरवर्ड पक्ष काही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात स्वत:चा उमेदवार उतरवणार नाही, विजयकडून काँग्रेसला किती मते दिली जातात तेही पहावे लागेल. लुईझिन फालेरो काँग्रेसपासून दूर आहेत. अर्थात त्यांच्याकडे जास्त मतेही नाहीत. ते निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये उडी टाकतात काय ते पाहुया.

कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने आपले काही उमेदवार उभे केले. लोकसभा निवडणुकीवेळी दक्षिण गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उमेदवार उभा करील काय ते पाहावे लागेल. अर्थात राष्ट्रवादीने उमेदवार उभा केला तरी काही फरक पडणार नाही. आम आदमी पक्षाने उमेदवार उभा केला तर मात्र फरक पडेल. भाजपसोबत राहणारे व भाजपच्या विरोधात लढणारे अशा दोन्ही प्रकारच्या छोट्या पक्षांची यावेळी मोठी कसोटी आहे. निवडणूक जवळ आली की, चित्र अधिक स्पष्ट होईल.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: fate of small parties will be determined in lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.