वडिलांनी मोबाईल परत घेतल्याने मुलाची आत्महत्या, स्वत:लाच दिला विजेचा शॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 05:16 AM2017-11-22T05:16:37+5:302017-11-22T05:16:47+5:30
डिचोली : दहावीत शिकत असलेल्या मुलाला परीक्षेत कमी गुण पडल्याने पालकांनी खडसावले व त्याच्याकडील महागडा मोबाईल परत घेतल्याने रागाच्या भरात एकाने आत्महत्या केली.
डिचोली : दहावीत शिकत असलेल्या मुलाला परीक्षेत कमी गुण पडल्याने पालकांनी खडसावले व त्याच्याकडील महागडा मोबाईल परत घेतल्याने रागाच्या भरात एकाने आत्महत्या केली. मंगळवारी शिवोलकरवाडा-मुळगाव येथे ही दुर्दैवी घटना घडली.
साईश वेर्णेकर (१५) यास पहिल्या सत्रात सर्वच विषयांमध्ये कमी गुण मिळाले होते. त्यामुळे त्याचे वडील सुनील वेर्णेकर यांना शाळेत बोलावून शिक्षकांनी तशी कल्पना दिली होती. त्यानंतर वेर्णेकर यांनी साईशचे अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याच्याकडील मोबाईल काढून घेतला. त्यामुळे नाराज झालेल्या साईशने सोमवारी आत्महत्या करण्याची धमकी आई-वडिलांना दिली होती; मात्र त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही.
मंगळवारी सकाळी मोठा भाऊ महाविद्यालयात, तर लहान भाऊ शाळेत गेला होता. आई-वडील काही कामानिमित्त घराबाहेर गेल्याची संधी साधत साईशने विजेच्या वायरचे आवरण काढून ती स्वत:च्या डोक्याला, हातांना व पोटाला गुंडाळून घेतली. नंतर वीज प्रवाह सुरू करून शॉक लावून घेतला. संध्याकाळी साईशचे वडील घरी आल्यानंतर त्यांना जळाल्याचा वास आला. त्यांना घरात वीजप्रवाह उतरल्याचे समजताच त्यांनी मुख्य स्विच बंद केला. आतील खोलीत साईश विजेच्या झटक्याने जळालेल्या अवस्थेत त्यांना दिसला.
>दुसरी आत्महत्या
काही दिवसांपूर्वी न्हावेली-साखळी येथेही एका महाविद्यालयीन युवतीने वडील मोबाईल घेऊन देत नसल्याच्या कारणाने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली होती.