वडीलच म्हणाले, सूचनाची मानसिकता बिघडलीय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2024 09:29 AM2024-02-01T09:29:24+5:302024-02-01T09:29:40+5:30
पणजी बाल न्यायालयाकडे पुन्हा मानसिक चाचणी करण्याची मागणी.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : आपल्याच चार वर्षांचा मुलगा चिन्मय याला गोव्यात आणून खून केल्याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या बंगळुरुस्थित कंपनीच्या सीईओ सूचना सेठ हिची मानसिक स्थिती ठीक नसल्याचा दावा आता तिच्या वडिलांनीच केला आहे. त्यामुळे तिची पुन्हा एकदा मानसिक चाचणी करण्याची मागणीही त्यांनी पणजी बाल न्यायालयाकडे केली आहे.
आपल्या कोवळ्या ४ वर्षे वयाच्या मुलाचा खून करून त्याचा मृतदेह सुटकेसमध्ये घालून नेण्याचा प्रकार या सूचनाने केल्यामुळे संपूर्ण गोवा हादरला होता. पती-पत्नीच्या भांडणात मुलाचा गेलेला बळी पाहून सर्वजण हळहळले. खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आलेल्या सूचनाला किमान १ वर्ष तरी तुरुंगात राहावे लागणार असा तर्क केला जातो. कोलवाळ तुरुंगात असलेल्या सूचनाच्या वडिलांनी आता वैद्यकीय पार्श्वभूमीवर तिला सोडविण्यासाठी हालचाली चालविल्या आहेत.
सूचनाची मानसिक स्थिती ही ठीक नसल्यामुळे ती काय करते हे तिलाच ठाऊक नसते, असा दावा त्यांनी केला आहे. त्यासाठी तिची पुन्हा एकदा मानसिक चाचणी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी पणजी बाल न्यायालयाकडे केली आहे. बाल न्यायालयाने त्यांची याचिका दाखल करून घेऊन यावर पोलिसांना आपले म्हणणे स्पष्ट करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे पोलिसांना या प्रकरणात प्रतिज्ञापत्र सादर करून आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे.
१४ दिवसांची कोठडी
पोलिसांनी सूचनाला न्यायालयात उपस्थित केले. न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. पोलिसांनी तिची कोठडीतील चौकशी पूर्ण केल्यामुळे तिची पोलिस कोठडी मागितली नाही. यामुळे यापुढचा काळ तिला कोलवाळ तुरुंगातच काढावा लागणार आहे. सुरुवातीला या प्रकरणात सूचना पोलिसांना सहकार्य करत नव्हती.