तिसवाडीत श्रीपाद नाईक यांना अनुकूल मतदान; सांताक्रुझमध्ये चुरस
By किशोर कुबल | Published: May 9, 2024 11:07 AM2024-05-09T11:07:08+5:302024-05-09T11:08:54+5:30
पणजी, ताळगाव, कुंभारजुवेव सांत आंद्रेत बाजी मारणार?
किशोर कुबल, लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: तिसवाडी तालुक्यात सांताक्रुझ मतदार संघातील चुरस वगळता इतर चार मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवार श्रीपाद नाईक यांना अनुकूल मतदान झाल्याचे दिसून येत आहे. पणजी, ताळगाव, कुंभारजुवे व सांत आंद्रेत ते बाजी मारतील, असेच एकूण चित्र आहे.
पणजी मतदारसंघात तुलनेत झालेले कमी मतदान चर्चेचा विषय ठरला आहे. परंतु भाजपचे स्थानिक आमदार तथा महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात व प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हे मात्र पणजीत श्रीपाद यांनाच मताधिक्य मिळेल याबाबत निश्चित आहेत. ताळगाव ग्रामपंचायतीचीही निवडणूक झाल्याने मंत्री बाबूश मोन्सेरात पंचायतीच्या निवडणुकीत व्यस्त राहिले. बाबूश मतदारसंघांमध्ये कमी फिरले म्हणून मतदान कमी झाले असावे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कुंभारजुवे मतदारसंघात ७३ टक्के मतदान झालेले आहे. कुंभारजुवेत दिवाडी, सांत इस्तेव्ह, जुने गोवे भागात काँग्रेससची पारंपरिक मते आहेत. तेथे बऱ्यापैकी मतदार घराबाहेर पडले. काँग्रेसची ही एकगठ्ठा मते मानली जातात. राजेश फळदेसाई हे गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यांना ६७७६ मते मिळाली होती. आता ते भाजपात आहेत.
पणजी मतदारसंघात तुलनेत कमी ६७.२६ टक्के मतदान झालेले आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तिकीट नाकारल्याने अपक्ष म्हणून लढलेले उत्पल पर्रीकर हे या निवडणुकीत मोदींच्या बाजूने होते. पर्रीकर समर्थकांनीही श्रीपाद नाईक यांना मतदान केले आहे. काँग्रेस उमेदवार रमाकांत खलप यांना चर्च स्क्वेअर, कांपाल, मिरामार भागात काही मते मिळतील.
सांत आंद्रे मतदारसंघात ६८.६२ टक्के मतदान झालेले आहे. आरजीचे वीरेश बोरकर यांचे असे म्हणणे आहे की, या निवडणुकीत आरजीचे उमेदवार मनोज परब यांना सांत आंद्रेत आपल्यापेक्षा किमान १ हजार मते जास्त मिळतील. प्रत्यक्षात येथील मतदानाचा कानोसा घेतला असता श्रीपाद यांना अनुकूल मतदान झाल्याचे दिसून येत आहे.
आजोशी, मंडूर, डोंगरी भागात श्रीपादना मताधिक्क्य मिळेल. सांताक्रुझमध्ये ७१.०५ टक्के मतदान झाले आहे. खुद्द सांताक्रुझ गावात तसेच कालापूर, चिंबल, मेरशीत काँग्रेसची एकगठ्ठा मते आहेत. या मतदारसंघात भाजपला तसे अनुकूल मतदान झाल्याचे दिसत नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार रुडॉल्फ फनर्नाडिस यांनी भाजप उमेदवार टोनी फनर्नाडिस यांचा पराभव केला होता. ताळगांव मतदारसंघात एनआयओ परिसर, व्हडलेभाटचा काही भाग, करंझाळे येथील आदर्श कॉलनी परिसरात भाजपची पारंपरिक मतें श्रीपाद यांनाच मिळतील.
मतदान कमी झाले तरी ७० टक्के मते श्रीपाद यांनाच : बाबूश
मंत्री बाबूश मोन्सेरात म्हणाले, लोकसभेसाठी एरव्हीच कमी मतदान होते. पणजीत। ७० टक्के मते भाजप उमेदवार श्रीपाद नाईक यांना मिळतील. उर्वरित ३० टक्के इतरांना जातील. ताळगावमध्येही श्रीपाद यांना मोठे मताधिक्क्य मिळेल. लोकसभेसाठी या मतदारसंघात ६७ टक्के मतदान हे प्रमाण तसे कमी नाही. अन्य काही विधानसभा मतदारसंघांच्या तुलनेत कमी मतदान होण्यास वेगवेगळी कारणे आहेत. काहीजण सुट्टी मिळाल्याने सहलीवर गोव्याबाहेर गेले होते. काहीजणांनी पणजीतून स्थलांतर केलेले आहे, अशी अनेक कारणे आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले की, लोकसभेसाठी पणजीत पूर्वीपेक्षा जास्त मतदान झालेले आहे त्यामुळे स्थानिक आमदार किंवा भाजपची यंत्रणा लोकांना मतदानाचा हक्क बजाव- ण्यासाठी घराबाहेर काढण्यास अपयशी ठरली, असे मुळीच नाही. राज्यात या निवडणुकीसाठी सर्वत्रच जास्त मतदान झालेले आहे.