कोरोनाचे भय; गावे घाबरली, शहरे बावरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 08:41 PM2020-06-06T20:41:59+5:302020-06-06T20:42:46+5:30
कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे सरकारी यंत्रणेवरील ताण वाढला
पणजी : राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढू लागल्याने व त्याविषयीच्या अफवांनाही वेग आल्याने काही तालुक्यांमधील छोटी गावे घाबरली आहेत. तर शहरे बावरून जाऊ लागली आहेत. ग्रामीण भागात लोक स्वत:हून आपले व्यवहार बंद ठेवू लागले आहेत. कोरोना रुग्ण कोणत्या गावात किती आहेत याची नेमकी माहिती सरकारही उघड करत नाही. पण आरोग्य खात्याचे काही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर व अशा कर्मचाऱ्यांची निवासस्थाने सत्तरी तालुक्यासह अन्य काही ठिकाणी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काही गावे घाबरूनच गेली आहेत.
लोकांनी एकमेकांच्या घरी जाणे बंद केल्याची उदाहरणे गावांमध्ये सापडू लागली आहेत. सत्तरीतील गुळेली गावाने गावातील सगळी दुकाने स्वत:हून बंद ठेवली. लोक घरातच राहू लागले आहेत. बाहेर पडत नाहीत. हाच प्रकार काही प्रमाणात अन्य ठिकाणी पहायला मिळतो. नातेवाईक जास्त संख्येने एकमेकांच्या घरी जात नाहीत. मांगोरहीलला कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर सरकारी यंत्रणेवरील ताण वाढला. लोकांमधील वातावरणातही ताण अनुभवास येत आहे. सांगेतील एका गावातही चिंतेचे वातावरण आहे. मांगोरहीलमुळे पूर्ण वास्को परिसर चिंताग्रस्त बनला. आज रविवारी सायंकाळपासून वास्कोच्या भाजी विक्रेत्यांनी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोणता रुग्ण कोणत्या गावातील आहे हे सरकार जाहीर करत नाही पण लोकांना ते कळून येऊ लागले आहे. पोलिसांकडूनही लोकांना माहिती मिळते.
राज्यात कोरोनाचे भय वाढल्यानेच राज्यातील मशीदी येत्या दि. 3० जूनपर्यंत खुल्या करायच्या नाहीत असे असोसिएशन ऑफ ऑल गोवा मुस्लिम जमातने जाहीर केले आहे. सरकारने येत्या सोमवारपासून मंदिरे, चर्चेस, मशीदी अशी प्रार्थनास्थळे खुली करता येतात पण तिथे सामूहिक सोहळे होऊ नयेत असे म्हटले होते. मात्र मशीद खुली करण्यास संघटना तयार नाही.