मंत्री मांद्रेकरांची भीती व्यर्थ
By Admin | Published: May 28, 2016 02:39 AM2016-05-28T02:39:17+5:302016-05-28T02:44:01+5:30
पणजी : सांस्कृतिक ग्रेस मार्कांच्या बाबतीत कला व संस्कृतीमंत्री दयानंद मांद्रेकर यांनी केलेले विधान वादाचा विषय ठरले आहे.
पणजी : सांस्कृतिक ग्रेस मार्कांच्या बाबतीत कला व संस्कृतीमंत्री दयानंद मांद्रेकर यांनी केलेले विधान वादाचा विषय ठरले आहे. निकाल जास्त लागणार आणि अॅडमिशनच्या अडचणी आणखी वाढणार, ही त्यांची भीती व्यर्थ आहे. तसेच सर्वांना शिक्षण ही संकल्पना पुढे न्यायची असेल तर शिक्षणाच्या सुविधा वाढल्या पाहिजेत, असे मत व्यक्त केले जात आहे.
शिक्षणतज्ज्ञ नारायण देसाई म्हणाले की, प्रत्येकाला शिक्षण मिळावे यासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध करणे ही सरकारची जबाबदारी आहे तेथे हात झटकून चालणार नाही. शिक्षणविषयक जे राष्ट्रीय धोरण आहे त्यात विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्याचा अंतर्भाव आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी नैसर्गिक गुण असतात त्याला शिक्षणाच्या माध्यमातून वाव मिळावा, असा याचा अर्थ आहे. खेळाडूंना जर क्रीडा गुण दिले जात असतील तर कला व सांस्कृतिक क्षेत्रात कामगिरी बजावणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सांस्कृतिक ग्रेस मार्क मिळायला
हवेत.
माजी प्राचार्य सुरेंद्र सिरसाट म्हणाले की, निकाल जास्त लागेल याची भीती सरकारने बाळगण्याचे कारण नाही. मुलांच्या अंगात असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना किती सवलती देता येतील हे पाहावे. क्रीडा गुणांच्या धर्तीवर सांस्कृतिक क्षेत्रात चमकणाऱ्या मुलांचीही कदर व्हायला हवी, त्यांना ग्रेस मार्क मिळायला हवेत. निकाल जास्त लागण्यास अन्य कारणेही आहेत. अनेकदा मुलांना अंतर्गत २0 गुण पैकीच्या पैकी दिले जातात, त्यामुळेही निकाल वाढतो. दुसरी बाब म्हणजे सरकार सर्वांनाच नोकऱ्या देऊ शकत नाही. कलेत करिअर करून एखादा जर पोट भरू शकत असेल तर त्याला उत्तेजन देणे सरकारचे कर्तव्य आहे. त्याची सुरुवात कला, सांस्कृतिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देऊनच व्हावी.
करिअर मार्गदर्शक तथा मुख्याध्यापक रामदास केळकर म्हणाले की, सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांचा ग्रेस मार्कांसाठी विचार व्हायला हवा. रेमोसारखा कलाकार आज नाव कमावून ब्रॅण्ड अॅम्बेसिडर बनतो. क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांनाही हा लाभ मिळायला हवा.
(प्रतिनिधी)