आजचा अग्रलेख: दलाल, भिकाऱ्यांची धास्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 08:35 AM2023-04-14T08:35:27+5:302023-04-14T08:36:58+5:30

उत्तर गोव्याची किनारपट्टी हा कायम वादाचा विषय असतो.

fear of broker and beggars in goa | आजचा अग्रलेख: दलाल, भिकाऱ्यांची धास्ती

आजचा अग्रलेख: दलाल, भिकाऱ्यांची धास्ती

googlenewsNext

उत्तर गोव्याची किनारपट्टी हा कायम वादाचा विषय असतो. तसाच तो सरकारी यंत्रणांच्या हितसंबंधांचाही विषय असतो. सध्या पर्यटनमंत्री रोहन खंवटे, कळंगुटचे भाजप आमदार मायकल लोबो आणि पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांची विधाने कुणीही ऐकली, तर कोणती यादवी सुरू आहे ते कळून येते. एकमेकांकडे बोट दाखविणे सुरू आहे. उत्तरेच्या किनारी भागात दलाल आणि भिकाऱ्यांचा उपद्रव वाढलाय, असे मायकल लोबो आणि मंत्री खंवटे हे दोन्ही नेते जाहीर करतात; पण सरकारी यंत्रणांकडून कारवाई होत नाही असे लोकांना वाटते. पोलिसांनी कारवाई करायला हवी असे पर्यटनमंत्री खंवटे सुचवतात, तर केवळ पोलिसांना दोष न देता पर्यटन खातेदेखील कारवाई करू शकते असे उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक स्पष्ट करतात. हा सगळा खेळ, दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप जर पाहिले तर एकूणच सरकार काय करते असा प्रश्न कुणालाही पडेल.

खंवटे व लोबो हे दोन्ही नेते भाजपमध्येच आहेत. मात्र, दोघांमध्येही सुप्त संघर्ष सुरू आहे. त्यात पुन्हा पोलिसांचे सँडवीच होत आहे, असे जाणवते. कळंगुट पोलिसांकडे खंवटे बोट दाखवतात. मायकल लोबो मात्र केवळ पोलिसांना दोष देण्यात अर्थ नाही अशी भूमिका घेतात. लोबो यांचा कळंगुट पोलिसांशी व्यवस्थित सूर जुळला आहे. शेवटी पोलिसांनाही मर्यादा असतात हे मान्य करावे लागेल. सरकारी यंत्रणांनी एकत्रितपणे दलालांविरुद्ध लढा देण्याची गरज आहे. कारवाई मोहीम सुरू होण्यासाठी पर्यटन खाते व पोलिस यंत्रणा यांनी संयुक्तपणे सक्रिय होण्याची गरज आहे. काल खंवटे यांनी पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन व पर्यटन खात्याचे संचालक यांची बैठक घेऊन काही सूचना केल्या आहेत.

कळंगुट कांदोळी- बागा-सिकेरी ही किनारपट्टी म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीला सोन्याची अंडी देणारी कोंबडी असे वाटते. त्यामुळेच दलालांचा सुळसुळाट व उपद्रव वाढला आहे. मध्यंतरी तर काही खंडणीखोरही उभे झाले होते. सरकारच्या वरच्या पातळीवरील काहीजणांचा या खंडणीखोरांशी परिचय होता. मायकल लोबो यांनी व काही रेस्टॉरंट व्यावसायिकांनी आवाज उठविणे सुरू केल्यानंतर मीडियामधून पोलखोल झाली. त्यामुळे सरकारही बिथरले व खंडणीखोर माघारी वळले. त्या खंडणीखोरांना कुणी पुढे काढले होते हे लपून राहिले नाही. आता दलालीचे आरोप, भिकाऱ्यांच्या उपद्रवाचे आरोप सुरू झाले आहेत. लोबो यांच्याकडे बरीच माहिती असते. त्यांनी ती पोलिसांना द्यावी व पोलिसांनी व्यापक कारवाई मोहीम सुरू करावी. मध्यंतरी खंडणी प्रकरणी पोलिसांनी अगदी चपळाईने काहीजणांना क्लीन चिट दिली होती. आता दलालांना क्लीन चिट न देता पोलिसांनी कारवाई सुरू केली तर बरे होईल.

कळंगुटमध्ये सायंकाळी सातनंतर फिरणेही महिलांना असुरक्षित वाटते, असे पर्यटनमंत्री खंवटे यांनी म्हटल्याचे काल प्रसिद्ध झाले आहे. सरकारमधील आमदार, मंत्रीच जेव्हा हताशपणे बोलू लागतात, तेव्हा एकूण सरकारच दलालांचा बिमोड करण्याविषयी नाकाम ठरतेय की काय, असा प्रश्न सामान्य माणसाला पडूच शकतो. ८०-९० च्या दशकात मुंबईवर अंडरवर्ल्डचे राज्य चालायचे, पोलिस दलातीलही काहीजण आतून फितूर असायचे. राजकीय व्यवस्थेमधील काही छुपे रुस्तम अंडरवर्ल्डशी निगडित घटकांना पाठीशी घालू पाहत होते. मात्र, मुंबई पोलिसांनीच शेवटी अंडरवर्ल्डचा खात्मा केला. काहीजण विदेशात पळून गेले. पोलिस कडक राहिल्याने मुंबईत टोळीयुद्धेही जवळजवळ थांबली. गोवा पोलिसांना किनारी भागात अधिक आक्रमक होत दलालांचा बिमोड करून सुरक्षित वातावरण निर्मिती करावी लागेल. यासाठी खंवटे व लोबो या दोन्ही नेत्यांचे पोलिसांना सहकार्य लागेल. किनारी भाग सुरक्षित राहिला तरच पर्यटन वाढेल. 

पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरवू नये म्हणून दलाल व भिकाऱ्यांना रोखावे लागेल. लोबो यांच्या म्हणण्याप्रमाणे खरोखर तीनशे भिकारी कळंगुटसह उत्तरेच्या किनारी भागात फिरत असतील तर ते किळसवाणेच म्हणावे लागेल. किनाऱ्यांवर तसेच रेस्टॉरंट परिसरात फिरणाऱ्या पर्यटकांना भिकाऱ्यांचा उपद्रव होऊ लागला तर गोव्याच्या पर्यटनाचा सर्वांनाच उबग येईल. कळंगुट पंचायत काही महिन्यांपूर्वी डान्स बारविरुद्ध बोलायची. कारवाईची भाषा करायची. आता त्याबाबत कुणी बोलत नाही. आता दलाल सोकावले असतील तर ते सरकारचेही अपयश ठरते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: fear of broker and beggars in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.