देशात रामराज्य, शिवराज्याची अनुभूती: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2024 02:00 PM2024-02-20T14:00:32+5:302024-02-20T14:03:09+5:30
शिवजयंतीदिनी डिचोलीत शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे रामराज्य व शिवराज्य देशात कार्यरत झालेले आहे. ज्या पद्धतीने सर्व घटकांना शिवरायांनी एकत्र करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले, त्याच धर्तीवर आज देश रामराज्य अनुभवू लागलेला आहे. शिवरायांचे विचार, आचार व संस्कार प्रत्येकाने आत्मसात करून अखंड भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कार्यरत राहावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
शिवरायांचा जयजयकार करीत भव्य शोभायात्रा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महिला व नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात डिचोलीच्या ऐतिहासिक शहरात शिवजयंती सोहळा साजरा केला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, खासदार सदानंद शेट तानावडे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार प्रेमेंद्र शेट, माजी सभापती राजेश पाटणेकर, नगराध्यक्ष कुंदन फळारी, महेश सावंत, शंकर चोडणकर, प्रदीप रेवोडकर, पर्यटन खात्याचे अधिकारी नगरसेवक व पदाधिकारी शोभायात्रेत सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, शिवाजी महाराजांनी बघितलेले स्वप्न प्रत्यक्ष साकारण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेत असत. त्यांनी सर्व घटकांना संघटित केले. विश्वकर्मा योजनेतून अठरा पगड जातींना एकत्र आणून त्यांचा उद्धार केला. राम मंदिर साकारले, सर्व योजना चालीस लावल्या. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने देशात रामराज्य व शिवरायांच्या स्वप्नातील राज्य कार्यरत होत आहे. शिवाजी महाराजांचे स्वप्न सुराज्य शिवराज्य करण्याचे होते तेच व्हिजन असलेले पंतप्रधान मोदी यांनी सर्वच क्षेत्रात दूरदृष्टी ठेवून महान कार्य सुरू ठेवले आहे. प्रत्येक घरात समृद्धी हा संकल्प ठेवून कार्य सुरू आहे. शिवरायांचे विचार प्रत्येकाने आत्मसात करावे, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले.
आमदार डॉ चंद्रकांत शेट्ये यांनी स्वागत केले. शिवाजी महाराज मैदानावर झालेल्या कार्यक्रमात खासदार सदानंद तानावडे यांनी शिवाजी महाराज ही मोठी प्रेरणाशक्ती असून त्यांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले.