फेरी चुकली अन् काळाने साधला डाव; बाणस्तारी अपघातात असे सापडले फडते दांपत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 10:41 AM2023-08-09T10:41:44+5:302023-08-09T10:44:32+5:30

परंतु त्या अगोदरच त्यांच्यावर काळाने झडप घातली.

ferry boat went wrong and accident took place in banastarim goa | फेरी चुकली अन् काळाने साधला डाव; बाणस्तारी अपघातात असे सापडले फडते दांपत्य

फेरी चुकली अन् काळाने साधला डाव; बाणस्तारी अपघातात असे सापडले फडते दांपत्य

googlenewsNext

अजय बुवा, लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : परेश सिनाय सावर्डेकर याने रविवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून तिघा निष्पापांचा बळी घेतला. यात मृत्युमुखी पडलेले सुरेश फडते व भावना फडते दाम्पत्यास जणू काळाने येथे खेचून आणले असावे, असेच काहीसे घडले आहे.

सुरेश फडते यांची एक बहीण लग्न करून कुंडई येथे दिलेली आहे. फडते राहतात, त्या दिवाडी भागात या दिवसात पावसाळी रानभाज्या मोठ्या प्रमाणावर उगवत असतात. अशाच काही भाज्या घेऊन सुरेश हे कुंडई येथील आपल्या बहिणीकडे निघाले होते, संध्याकाळी सातच्या फेरीने ते जाणार होते, परंतु सात वाजता निघणारी फेरी अवघ्या काही सेकंदांसाठी त्यांना चुकली. परिणामी, सात वाजून दहा मिनिटांनी निघणारी दुसरी फेरी त्यांनी पकडली. सात वाजताची फेरी त्यांना मिळाली असती, तर ते त्या दहा मिनिटांच्या फरकात ते कुंडईला आपल्या बहिणीच्या घरी पोहोचलेले असते.

खांडेपार येथील नंदनवन येथे फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने मोठी पार्टी झाली. या पार्टीत सावर्डेकर दाम्पत्य हजर होते. त्याच पार्टीत दारू ढोसून नंतर आपल्या आलिशान कारने निघाले. ७.३५ वाजता कुंडई येथून भरधाव जात असल्याचे तेथील सीसीटीव्हीत दिसत आहे. कुंडई मानस येथे वारंवार अपघात होत असल्याने, तिथे सीसीटीव्ही बसविल्याची माहिती कुंडईचे माजी सरपंच विश्वास फडते यांनी दिली. 

बांधत होते स्वप्नातला बंगला....

फडते यांचे नातेवाईक विश्वास फडते यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश हे प्रसिद्ध अशा फनस्कूल कंपनीत चांगल्या हुद्द्यावर कामाला होते. त्यांचा एक मुलगा पोलिस आहे. तर दुसरी मुलगी कायद्याचे शिक्षण घेत आहे. फडते यांनी आपल्या स्वप्नातला बंगला बांधण्यासाठी काम हाती घेतले होते. बंगल्याचे ६० टक्के काम पूर्ण होत आले आहे. अवघ्या काही महिन्यांत त्यांचा बंगला पूर्ण होणार होता, परंतु त्या अगोदरच त्यांच्यावर काळाने झडप घातली.

दोषींवर कठोर कारवाई होणार : मुख्यमंत्री सावंत

बाणास्तारी अपघाताची चौकशी पोलिस करीत आहेत. या अपघातात जे कोण दोषी आहेत, त्यांना शिक्षा ही होणारच, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुन्हा एकदा दिला आहे.

रविवारी बाणास्तारी पुलावर झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले होते. यात दिवाडी येथील फडते दाम्पत्याचा समावेश आहे. अपघात ज्या मर्सिडीज गाडीमुळे झाला ती एक बाई चालवत होती, असे काही प्रत्यक्षदर्शनी सांगितले आहे. तर काहींनी हे वाहन संशयित परेश सावर्डेकर चालवत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नक्की ही गाडी कोण चालवत होते त्यावरूनही संभ्रम निर्माण झाला आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, बाणास्तारी येथील अपघात ज्या गाडीमुळे घडला ती कोण चालवत होते ते पोलिसांना प्राप्त माहितीच्या आधारे समजले आहे. त्यामुळे हा अपघात घडण्यास जे कोण दोषी आहेत, त्यांना शिक्षा ही होणारच, असे त्यांनी स्पष्ट केले.

परेश सावर्डेकरचा कोठडीतच मुक्काम

रविवारी संध्याकाळी भरधाव वाहन चालवून तीन व्यक्तींच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या श्रीपाद ऊर्फ परेश सिनाय सावर्डेकर याचा जामीन अर्ज काल जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. सावर्डेकर यांच्या वतीने अॅड. सरेश लोटलीकर, अॅड. पाडगावकर यांनी बाजू मांडली, तर सरकारच्या वतीने अॅड. एस. सामंत यांनी बाजू मांडली. मंगळवारी सकाळी जामीन अर्जावर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद केला.

सरकारी वकील सामंत यां केलेल्या युक्तिवादात, संशयिताने दारू पिलेली असतानाही भरधाव गाडी चालवली त्यात तिघांचा जीव गेल्याचे सांगितले. तसेच अन्य तिघेही गंभीर जखमी असून या अपघातात मालमत्तेचेही प्रचंड नुकसान झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे परेश याच्यावर कलम ३०४ अंतर्गत नोंदवलेला गुन्हा योग्य आहे. परेश यांचे व्यावसायिक क्षेत्रात मोठे नाव असल्याने तपासात ते आपल्या प्रभावाचा फायदा घेऊ शकतात, त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये, असा युक्तिवाद केला.

त्याचवेळी सावर्डेकर यांच्या वकिलांनी कलम ३०४ लागू होत नसल्याचे सांगितले. तसेच या अपघाताचा तपास संपलेला आहे. संशयित सहकार्य करायला तयार आहे. त्याचबरोबर या अगोदर त्याला भरधाव वेगात गाडी चालवण्यासंबंधीचे चलन देण्यात आले आहे ते चुकीचे आहे. कारण त्यावेळी त्याची गाडी ड्रायव्हर चालवत असे म्हटले आहे. न्यायालयाने गाडीत आढळलेल्या दारूच्या बाटल्यांबाबत नाराजी व्यक्त करत जामीन अर्ज फेटाळला आहे.

कार महिलाच चालवत होती : दिग्विजय

मी काही क्षणांसाठी या अपघातातून वाचलोय. मी जेव्हा माझ्या गाडीतून बाहेर आलो आणि पाहिले तेव्हा मर्सिडीज कारच्या स्टेअरिंग सीटवर महिलाच बसलेली होती यात कुठलीही शंका नाही, असे बाणस्तारी अपघातातील प्रत्यक्षदर्शी दिग्विजय वेलिंगकर यांनी मंगळवारी पुन्हा विधान केले. मंगळवारी म्हार्दोळ पोलिसांनी वेलिंगकरला पोलिस स्थानकात बोलावून घेतले होते. यादरम्यान त्यांनी आपली साक्ष दिली. घटनास्थळीदेखील वेलिंगकर यांनी माध्यमांशी बोलताना हेच सांगितले होते. तसेच म्हार्दोळ पोलिस स्थानकात याबाबत रीतसर तक्रारदेखील दाखल केली.


 

Web Title: ferry boat went wrong and accident took place in banastarim goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.