जुने गोव्यातील फेस्तानिमित्त महाराष्ट्रातील भाविकांकडून पायपीट केल्या जातात वा-या 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 06:07 PM2017-11-28T18:07:12+5:302017-11-28T18:07:22+5:30

ख्रिस्ती धार्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या जगप्रसिद्ध अशा जुने गोव्यातील सेंट फ्रान्सिस झेवियर्सच्या फेस्तानिमित्त महाराष्ट्र तसेच कर्नाटकातील बेळगावातून हजारो भाविक पायपीट वारी करुन दरवर्षी आपला नवस फेडण्यासाठी गोव्यात येत असतात. 

Festivals of Old Goa are scattered by devotees of Maharashtra | जुने गोव्यातील फेस्तानिमित्त महाराष्ट्रातील भाविकांकडून पायपीट केल्या जातात वा-या 

जुने गोव्यातील फेस्तानिमित्त महाराष्ट्रातील भाविकांकडून पायपीट केल्या जातात वा-या 

Next

म्हापसा : ख्रिस्ती धार्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या जगप्रसिद्ध अशा जुने गोव्यातील सेंट फ्रान्सिस झेवियर्सच्या फेस्तानिमित्त महाराष्ट्र तसेच कर्नाटकातील बेळगावातून हजारो भाविक पायपीट वारी करुन दरवर्षी आपला नवस फेडण्यासाठी गोव्यात येत असतात. 

सेंट झेवियर अर्थात गोंयचो सायबच्या पुढील महिन्यात ४ डिसेंबरला होणा-या फेस्तानिमित्त पाळलेल्या व्रताचे पालन करण्यासाठी सिंधुदुर्ग, आजरा, गडहिंग्लज, कोल्हापूर, खानापूर सारख्या गोव्याच्या शेजारील भागातून हे भाविक दरवर्षी गोव्यात येत असतात. ठेवलेल्या व्रताचे पालन करण्यासाठी काही भाविकांची वारी किमान १५ दिवस फेस्ताच्या अगोदर सुरू होत असते. वारीवर येण्यासाठी बरेच दिवस अगोदर नियोजन केले जाते. यातील ब-याच वा-यांचे आयोजन संबंधीत भागातील एखाद्या चर्चमार्फत किंवा धार्मिक संस्थामार्फत केले जाते. त्यासाठी आगाऊ नोंदणी सुद्धा केली जाते. वारीवर येणारे भाविक केलेला नवस फेडण्यासाठी सुद्धा वारीवर येतात. तर काही भाविक असलेल्या श्रद्धेमुळे येत असतात.   

वारीच्या दरम्यान वाटेत विविध गावात वाटेत भेटणा-या चर्चमध्ये किंवा इतर प्रार्थनास्थळात विश्रांती घेतली जाते. भोजनासहीत रात्रीचा निवारा सुद्धा चर्चमध्ये केला जातो. दुस-या दिवशी माग पुन्हा वारीला सुरुवात केली जाते. वारी दरम्यान वाटेत भक्तीमय गिते गाऊन भजने सादर करुन देवाची सततची आराधना सुरुच ठेवली जाते. 

फादर (प्रिस्ट) सावियो बार्रेटो यांनी दिलेल्या माहितीनुसार वारीवर येणारे बरेच भाविक मागील ३० ते ४० वर्षांपासून नित्यनेमाने वारीसाठी येत असतात. त्यासाठी त्यांच्या भागातील फादरकडून नियोजन केले जाते. या वारी दरम्यान भाविक त्यांच्या हातून कोणतेच गैरकृत्य घडणार नाही हे कटाक्षाने पाळत असतात. व्रताचे आयोजन कडकपणे केले जाते. दारुला सुद्धा शिवले जात नाही. शाकाहारी आहाराचे सेवक केले जाते. पूर्ण श्रद्धेने ही वारी केली जाते. जुने गोवेपासून जवळ असलेल्या ठिकाणाची वारी चार दिवस अगोदर सुरु केली जाते असे फादर बार्रेटो यांनी सांगितले. वारीत दक्षिणेपेक्षा उत्तरेतील भाविकांचा जास्त समावेश असतो. 

फेस्तानिमित्त आयोजित होणा-या प्रार्थनात (नोव्हेना) सहभागी होण्यासाठी काही भाविक दोन दिवस अगोदर सुद्धा जुने गोव्यात दाखल होत असतात. येणा-या भाविकांना अडचणीचा सामना होऊ नये यासाठी निवासाची सोय सुद्धा करण्यात येत असते. शेजारील राज्यातून येणा-या भाविकांसाठी मराठीतून प्रार्थना सुद्धा आयोजित केल्या जातात. त्या बरोबर इतर महत्वाच्या देशी भाषांबरोबर काही विदेशी भाषातून सुद्धा प्रार्थना आयोजित केल्या जातात. फेस्तच्या नऊ दिवस अगोदर नोव्हेनाला सुरुवात होत असते तर दहाव्या दिवशी भक्तीभावाने फेस्त साजरे केले जाते. त्या दिवशी भाविकांचा महासागर जुने गोवे येथे दाखल होत असतो. 

शेजारील राज्यातून येणा-या भाविकांबरोबर राज्यातील भाविक सुद्धा फेस्ताच्या आदल्या दिवशी आपल्या गावातून वारी करीत फेस्ताला दाखल होत असतात. इतर भक्तांप्रमाणे राज्यातील भक्त मंडळी सुद्धा आपले नवस फेडण्यासाठी वारी करीत असतात. कर्नाटक तसेच केरळ राज्यातून वारीवर येणारे भाविक मात्र कमी आहेत.    

Web Title: Festivals of Old Goa are scattered by devotees of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा