गोव्यात फेस्टीव्ह मोसम सुरू, नाताळची जय्यत तयारी...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 01:19 PM2019-12-09T13:19:42+5:302019-12-09T13:19:53+5:30
नाताळनिमित्ताने ख्रिस्ती घरांवर आकर्षक रोषणाई केली जाईल.
पणजी : गोव्यात फेस्टीव्ह मोसम सुरू झाला आहे. सेरेंडिपीटी फेस्टीव्हल, नाताळ सण, इलेक्ट्रॉनिक डान्स महोत्सव (ईडीएम) असे अनेक सोहळे डिसेंबरमध्ये महिन्यात होणार आहेत. नाताळची राज्यात जोरदार तयारी सुरू झाली आहे. लाखो पर्यटकांची गर्दी डिसेंबरच्या अखेरीस गोव्यात होणार आहे.
जगप्रसिद्ध सेंट झेवियरचे फेस्त गेल्याच आठवड्यात जुनेगोवे येथे पार पडले. लाखो पर्यटक त्यावेळीही पणजी व जुनेगोवेत येऊन गेले. पणजीच्या चर्चचे फेस्त सोमवारी सुरू झाले. जत्रा आणि फेस्टीव्हलचा हंगाम सुरू झाला आहे. दि. 25 डिसेंबरपासून नाताळला आरंभ होईल. नाताळमध्ये गोवा पाहणो म्हणजे अनोखा अनुभव असतो. नाताळनिमित्ताने राजधानी पणजीसह बार्देश, सासष्टी, मुरगाव हे तालुके सजू लागले आहेत. गोव्यातील बारापैकी चार तालुक्यांमध्ये ख्रिस्ती धर्मीय बांधवांची संख्या बऱ्यापैकी आहे. मात्र नाताळ सण हा केवळ ख्रिस्ती गोमंतकीयांपुरताच आता मर्यादित राहिलेला नाही. नाताळमध्ये अनेक हिंदू बांधवही सहभागी होतात. नाताळ फेस्टीव्हल हे गोव्याच्या पर्यटन उद्योगाचेही एक महत्त्वाचे अंग बनले आहे.
नाताळनिमित्ताने ख्रिस्ती घरांवर आकर्षक रोषणाई केली जाईल. तसेच राज्यभरातील हॉटेल्सचे सौंदर्य वेगळा साज प्राप्त करील. गोव्याच्या उत्तर व दक्षिण किनारपट्टीला नाताळ सणाची चाहूल लागली आहे. पणजीसह किनारी भागात रंगरंगोटीचे व सजावटीचे काम सुरू आहे. नाताळानिमित्ताने व्यापा-यांनी ग्राहकांसाठी विविध ऑफर्स काढल्या आहेत. नववर्ष साजरे करण्यासाठी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लाखो पर्यटक गोव्यात येतील. गोव्याकडे येणा-या विमानांच्या तिकीटाचे दर हे 20 डिसेंबरपासून वाढणार आहेत. देशभरातील अनेक बडे राजकीय नेते, उद्योगपती, बॉलिवूडमधील सिनेतारे व तारका 30 डिसेंबर ते 1 जानेवारी या काळात दरर्षी गोव्यात असतात. यापूर्वी बच्चन कुटुंबासह अंबानी व अन्य अनेकांनी गोव्यात नववर्ष साजरे केले आहे. यावेळीही अनेक प्रसिद्ध व्यक्तींची कुटुंबे 31 डिसेंबरची रात्र गोव्यात घालवतील.
27 ते 29 डिसेंबर असे तीन दिवस उत्तर गोव्यातील वागातोर समुद्रकिनारी सनबर्न क्लासिक हा इलेक्ट्रॉनिक डान्स महोत्सव (ईडीएम) होणार आहे. या महोत्सवात पन्नास हजारपेक्षा जास्त पर्यटक व गोमंतकीय मिळून भाग घेऊन तीन दिवस अखंडीतपणो कर्णकर्कश संगीताच्या तालावर नृत्य करणार आहेत.
दक्षिण आशियामध्ये कला उत्पादनाला बळ मिळवून देण्यासाठी वावरणा-या सेरेंडिपीटी आर्ट्स फाऊंडेशनचा सेरेंडिपीटी हा प्रसिद्ध महोत्सव येत्या 15 पासून गोव्यात सुरू होणार आहे. त्यामुळेही पणजी ते जुनेगोवेर्पयतच्या पट्टय़ातील मोठ्या इमारतींवर आकर्षक अशा चित्रकृती रंगविण्याचे काम सध्या सुरू आहे. काही चित्रे साकारली आहेत. 22 डिसेंबपर्यंत हा कला उत्सव चालेल. गेल्याच आठवड्यात तीन दिवसांचा कला व साहित्य महोत्सव पार पडला. त्यात गोव्यासह विदेशातीलही अनेक लेखकांनी भाग घेतला.