अमली पदार्थ पकडण्याची प्रकरणे कमी, तरीही जप्त केलेला माल जास्तच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2021 09:14 PM2021-01-02T21:14:46+5:302021-01-02T21:16:03+5:30
सध्या गोव्यात किनारपट्टी भागात ड्रग्सचे प्रमाण जास्त आहे. ड्रग्सचे सेवन कमी व्हावे यासाठी गोव्यात मोठ्या प्रमाणावर जागृती करण्याचे काम हाती घेतल्याची माहिती गावकर यांनी दिली.
मडगाव: कोविडच्या सावटाखाली सरलेल्या 2020 मध्ये गोव्यात अमली पदार्थ पडकण्याची प्रकरणे 2019 च्या तुलनेत कमी असली तरी पडकण्यात आलेला माल 2019 च्या तुलनेत तब्बल 80 टक्के अधिक आहे. त्यामुळे लॉकडाऊन असतानाही गोव्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट होता हे सिद्ध झाले आहे. 2019 साली गोवा पोलिसांनी 85 किलो अमली पदार्थ जप्त केले होते 2020 साली हे प्रमाण 146 किलोवर पोहोचले आहे.
यासंदर्भात बोलताना अमली पदार्थ विरोधी विभागाचे महेश गावकर म्हणाले, माल पकडण्याचे प्रमाण वाढले याचा अर्थ गोव्यात ड्रग्सचा वावर वाढला आहे असे नसून यंदा पोलिसांनी अधिक कार्यक्षमता दाखविल्याने अधिक माल पकडला गेला आहे. अशी प्रकरणे नोंद करण्याची आम्ही नवी पध्दत सुरू केली असून त्याचा हा परिणाम असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सध्या गोव्यात जो गांजा येतो तो मुख्यतः कर्नाटक , हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथून आणला जातो. तर सिंथेटिक ड्रग्स विदेशातून आणले जातात. यंदा गोव्यातही काही ठिकाणी गांजाची लागवड केली जात असल्याची उदाहरणे दिसून आली. यासंबंधी गावकर याना विचारले असता ते म्हणाले, ती अपवादात्मक प्रकरणे होती. गोव्यातील वातावरण गांजाच्या शेतीला पूरक नसल्याने गोव्यात त्याचे व्यावसायिक उत्पादन करणे शक्य नसल्याचे ते म्हणाले.
सध्या गोव्यात किनारपट्टी भागात ड्रग्सचे प्रमाण जास्त आहे. ड्रग्सचे सेवन कमी व्हावे यासाठी गोव्यात मोठ्या प्रमाणावर जागृती करण्याचे काम हाती घेतल्याची माहिती गावकर यांनी दिली.