परवानगीपूर्वी तिकीट विक्री करणाऱ्या सनबर्न आयोजकांवर गुन्हा नोंदवा - युरी आलेमाव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 04:08 PM2024-07-14T16:08:18+5:302024-07-14T16:10:26+5:30
आलेमाव म्हणाले की, उत्तर गोव्याचे ड्रग अँड क्राइम हबमध्ये रुपांतर केल्यानंतर मुख्यमंत्री सावंत आणि पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारची वक्रदृष्टी आता दक्षिण गोव्यावर पडली आहे.
तुकाराम गोवेकर
मडगाव : राज्य सरकारकडून अद्याप परवानगी मिळालेली नसताना सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजकांतर्फे अधिकृत एक्स हँडलवर प्री-सेल तिकिटांसाठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सरकारच्या मान्यतेशिवाय जाहिरात प्रसिद्ध केल्याबद्दल आयोजकांविरुद्ध मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुन्हा नोंदवावा अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली. हा सरकारशी असलेल्या मॅच फिक्सिंगचा भाग आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी केला.
आलेमाव म्हणाले की, उत्तर गोव्याचे ड्रग अँड क्राइम हबमध्ये रुपांतर केल्यानंतर मुख्यमंत्री सावंत आणि पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारची वक्रदृष्टी आता दक्षिण गोव्यावर पडली आहे. २०२४ मध्ये दक्षिण गोव्यात सनबर्न फेस्टिव्हलला परवानगी देऊन लोकसभा पराभवाचा बदला घेण्याचा हा भाजपचा डाव आहे, असा आरोप त्यांनी केला. सरकारचे सनबर्न आयोजकांशी साटेलोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच दक्षिण गोव्यात कार्यक्रम आयोजित करण्यासाठी फेस्टिव्हलने जाहिराती दिल्या आहेत. त्यावर सरकारने कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप त्यांनी केला.
सनबर्नसारख्या उपक्रमांना चालना देऊन सरकारने गोव्याची संस्कृती आणि वारसा संपवला आहे. अशा फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींचे मृत्यू झाले, हे सर्वांनाच माहीत आहे, परंतु सरकारने नेहमीच तथ्य लपवले आहे, असे आलेमाव म्हणाले. सनबर्नला कुठेही कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी देऊ नये. आम्ही दक्षिण गोव्यात नक्कीच मान्यता दिली जाणार नाही आणि उत्तर गोव्यातही आम्ही प्रखर विरोध करू. फेस्टिव्हलमुळे गोव्याचे पुरेसे नुकसान झाले आहे आणि आता तो कायमचा बंद करण्याची वेळ आली आहे, असे आलेमाव यांनी सांगितले आहे.