चित्रपट अनुदानाचे प्रमाण ४० लाखांपर्यंत
By admin | Published: April 15, 2016 02:11 AM2016-04-15T02:11:13+5:302016-04-15T02:14:35+5:30
पणजी : गोवा मनोरंजन संस्थेने सुधारित चित्रपट अनुदान योजना तयार केली आहे. गोव्यातील निर्र्मात्यांना चित्रपटांच्या निर्र्मितीसाठी
पणजी : गोवा मनोरंजन संस्थेने सुधारित चित्रपट अनुदान योजना तयार केली आहे. गोव्यातील निर्र्मात्यांना चित्रपटांच्या निर्र्मितीसाठी अगोदर २५ लाखांचे अर्थसाह्य दिले जात होते. आता हे प्रमाण ४० लाख रुपयांपर्यंत वाढवावे, अशा स्वरूपाचा प्रस्ताव मनोरंजन संस्थेने सरकारकडे सुपुर्द केला आहे. सुधारित योजना याच महिन्यात अधिसूचित होईल, असा विश्वास मनोरंजन संस्थेचे अध्यक्ष दामोदर नाईक यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला.
नाईक म्हणाले की, चित्रपट अनुदान योजनेत अनेक सुधारणा होणे गरजेचे होते. ती मार्गी लावण्यासाठी मनोरंजन संस्थेने कष्ट घेतले. पूर्ण सुधारित योजना तयार करून सरकारला सादर केली आहे. ४० लाखांपर्यंत अनुदान वाढ आम्ही सुचविली आहे. सरकार त्याविषयी अंतिम निर्णय घेईल. अनुदानाच्या लाभासाठी चित्रपटाचा निर्माता गोमंतकीय असावा, अशी अट लागू करण्यात आली आहे.
नाईक म्हणाले की, दोनापावल येथे ज्या जागेत पूर्वी आयटी हॅबिटेट होते, त्या जागेत इफ्फीसाठी साधनसुविधा उभ्या केल्या जातील. त्यासाठी मोठे संकुल साकारेल. त्यासाठी दोनापावलची सुमारे २ लाख १९ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा आम्ही सरकारकडून मनोरंजन संस्थेच्या ताब्यात घेतली आहे. या पुढील काळात पुढील काम सुरू होईल.
नाईक म्हणाले की, २०१४-१५ साली झालेल्या इफ्फीच्या अनुषंगाने जी विविध बिले मनोरंजन संस्थेकडे आली होती, त्यातील ९० टक्के बिले फेडण्याबाबतचे सगळे सोपस्कार पूर्ण झाले आहेत. मनोरंजन संस्थेला आता आयनॉक्सच्या परिसरातील पे पार्किंगद्वारेही महसूल मिळत आहे. पूर्वी हे काम कंत्राटदाराकडे देण्यात आले होते. आता हे काम मनोरंजन संस्था स्वत:च करत आहे.
(खास प्रतिनिधी)