जीएसटीच्या बैठकीसाठी देशभरातील अर्थमंत्री गोव्यात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 08:00 PM2019-09-19T20:00:05+5:302019-09-19T20:05:18+5:30
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) मंडळाच्या 37 व्या राष्ट्रीय बैठकीत भाग घेण्यासाठी देशातील अनेक राज्यांचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री गुरुवारी गोव्यात दाखल झाले आहे.
पणजी: वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) मंडळाच्या 37 व्या राष्ट्रीय बैठकीत भाग घेण्यासाठी देशातील अनेक राज्यांचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री गुरुवारी गोव्यात दाखल झाले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन देखील उद्या (शुक्रवारी) सकाळी साडेसात वाजता गोव्यात दाखल होणार आहेत.
जीएसटी मंडळाची राष्ट्रीय बैठक प्रथमच गोव्यात होत असून आज अधिकाऱ्यांच्या स्तरावर तयारीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याचे अर्थ सचिव, वाणिज्य कर आयुक्त वगैरे या बैठकीत सहभागी झाले. तसेच अन्य राज्यांतूनही सुमारे सत्तर-ऐंशी वरिष्ठ अधिकारी आले असूनतेही बैठकीत सहभागी झाले. जीएसटी मंडळावरील गोव्याचे सदस्य मंत्री माविन गुदिन्हो हेही यावेळी उपस्थित होते. पणजीपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कदंब पठारावरील एका मोठ्या हॉटेलमध्ये ही बैठक होत आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत देखील या बैठकीत सहभागी होणार असून गुजरात, दिल्ली, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, बिहार आदी विविध राज्यांतील अर्थमंत्री तसेच काही राज्यांचे उपमुख्यमंत्री बैठकीसाठी गुरुवारीच गोव्यात दाखल झाले. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता निर्मला सितारामन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडणार आहे.
गोव्यातील हॉटेलमधील रुम्सवर असलेल्या जीएसटीचे प्रमाण 12 किंवा 14 टक्के जीएसटी केले जावे, अशी मागणी पर्यटन क्षेत्रतील व्यवसायिकांनी केली आहे. आजच्या बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेवर हा विषय असून जीएसटीसंबंधी कोणतीही शिफारस केंद्र किंवा राज्य सरकारला करण्याचा अधिकार या मंडळाला आहे. हॉटेलांच्या रुम्सवर दरावरील जीएसटीचा विषय मंडळाच्या बैठकीच्या अजेंड्यावर आहे. जीएसटी किती कमी करावा किंवा अन्य कोणता निर्णय घ्यावा ते शेवटी मंडळाच्या बैठकीत ठरू शकते असं वक्तव्य वाणिज्य कर आयुक्त दिपक बांदेकर यांनी स्पष्ट केले.