दोन हेल्मेटच्या किमतीएवढा होतो दंड; गेल्या २ वर्षांत ५६ लाखांची वसुली, दहापट दंड वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 01:50 PM2023-02-15T13:50:19+5:302023-02-15T13:51:13+5:30

गेल्या दोन वर्षांत हेल्मेटचा वापर न करणाऱ्यांकडून ५६ लाख रुपयांचा दंड वाहतूक पोलिसांनी वसूल केला आहे.

fine is equal to the cost of two helmets 56 lakh recovered in last 2 years fine increased tenfold | दोन हेल्मेटच्या किमतीएवढा होतो दंड; गेल्या २ वर्षांत ५६ लाखांची वसुली, दहापट दंड वाढला

दोन हेल्मेटच्या किमतीएवढा होतो दंड; गेल्या २ वर्षांत ५६ लाखांची वसुली, दहापट दंड वाढला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा: राज्यातील विविध भागांत दररोज अपघात घडत असतात. या अपघातांपैकी जास्त घटना या दुचाकी वाहनांच्या अपघाताच्या असल्याचे दिसून येते. हेल्मेटचा वापर न केल्याने घडणाऱ्या या अपघातांतून कितीतरी जण गंभीर जखमी होत असतात किंवा अनेकांना त्यांचे प्राण गमावण्याची वेळसुद्धा येते. 

वाढत्या दुचाकी अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतुकीचे नियम कडक केले आहेत. या नियमांची पोलिसांकडून सक्तीने अंमलबजावणी करण्यात येत आहे. पोलिसांनी मोहीम सुरू केल्याचे दिसून येते. सक्तीची कारवाई सुरू असूनसुद्धा नियमांचे उल्लंघन करणारे दिसतात. ते पोलिसांच्या तावडीत नियमित सापडतात. अशांना दंड भरावा लागतो. सध्या विनाहेल्मेट प्रवासासाठी १ हजार रुपये दंड आकारला जात आहे. गेल्या वर्षभरात २६ हजारांहून जास्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली.

१००० रुपये भरा

एप्रिल २०२२ पासून दंडाची असलेली रक्कम १०० रुपयावरून १ हजार रुपये करण्यात आली. तेव्हापासून ते डिसेंबर २०२२ अखेर एकूण २०६३ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दंडाच्या रुपात २०.६३ लाख रुपये वसूल करण्यात आले आहे. दंडाची रक्कम वाढतच असल्याचे दिसून येत आहे.

पोलिसांकडून ५६ लाखांच्या दंडाची वसुली

गेल्या दोन वर्षांत हेल्मेटचा वापर न करणायांकडून ५६ लाख रुपयांचा दंड वाहतूक पोलिसांनी वसूल केला आहे. २०२१ साली दंडाची रक्कम २९.७८ लाख रुपये होती तर २०२२ साली २६.२१ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.

परवाना रद्दची शिफारस

दंडाची रक्कम वाढवल्यानंतर हेल्मेटचा वापर न करणाऱ्या वाहन चालकांविरोधात कडक पावले उचलताना परवाना रद्द करण्यात यावा, अशी शिफारस वाहतूक विभागाने वाहतूक खात्याला केली आहे.

पोलिसांना हेल्मेट सक्ती

सर्व पोलिस हेल्मेटचा वापर करीत असले तरी हेल्मेटचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई करताना स्वतः पोलिस हेल्मेटचा वापरतील याची खबरदारी घेतली आहे. तशी सक्ती केली आहे.

हेल्मेटचा वापर करणे अत्यावश्यक आहे

वाढत्या अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वत:ची सुरक्षा लक्षात घेऊन हेल्मेटचा वापर करणे अत्यावश्यक आहे. हेल्मेटचा वापर न करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई केली जात असली तरी वाहन चालकांनी हेल्मेटचा वापर करावा यासाठी विविध स्तरावर जागृती करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहे. या संबंधीचे महत्त्व पटवून दिले जात आहे. - तुषार लोटलीकर, वाहतूक निरीक्षक

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: fine is equal to the cost of two helmets 56 lakh recovered in last 2 years fine increased tenfold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा