गोव्यातील मोबोर किनाऱ्याजवळील सोळा दुकानांना आग लागून वीस लाखांची हानी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 09:28 PM2019-04-14T21:28:23+5:302019-04-14T21:29:24+5:30
- गोव्यातील दक्षिण गोव्यातील मोबोर समुद्रकिनाऱ्यानजीक असलेल्या सोळा दुकानांना आज रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आग लागून वीस लाखांची हानी झाली.
मडगाव - गोव्यातील दक्षिण गोव्यातील मोबोर समुद्रकिनाऱ्यानजीक असलेल्या सोळा दुकानांना आज रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आग लागून वीस लाखांची हानी झाली. दुपारी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मडगाव अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेउन तब्बल पाच तास अथक प्रयत्न करुन शेवटी ही आग विझविली. या दुर्घटनेत एकूण 50 लाखांची मालमत्ता बचाविण्यात आल्याची माहिती मडगाव अग्निशामक दलाच्या कार्यालयातून देण्यात आली. आगीचे नेमके कारण स्पष्ट होउ शकले नाही. कोलवा पोलिसांनीही घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
अँथनी कादरेज व त्यांचा भाऊ विल्सन कादरेज यांच्या मालकीच्या आठ दुकानांना आग लागली. या दुकानांत रेडिमेड कपडे, कृत्रिम दागिने, बाहुल्या व अन्य वस्तु विकल्या जात होत्या. या आगीत कादरेज बंधुचे एकूण दहा लाखांची मालमत्ता जळून खाक झाली तर फ्रेडी कादरेज यांच्या मालकीच्याही आठ दुकानांना आग लागली. याही दुकानांमध्ये कृत्रिम दागिने, रेडीमेड कपडे व अन्य वस्तु विकल्या जात होत्या. फ्रेडी यांचे या दुर्घटनेत एकूण दहा लाखांच्या मालमत्तेची हानी झाली.
ही सर्व दुकाने एकमेकांना लागून होती. आग लागल्यानंतर दुकानातील वस्तु काहीजणांनी बाहेर काढून दुसरीकडे हलविल्या. दुपारी सुटलेल्या वा:यांमुळे आग फैलावत गेली व जवळपासच्या दुकानांला आगीने वेढले.
आग विझविण्यासाठी मडगाव अग्निशामक दलाच्या कार्यालयातून दोन बंब तर कुडचडे येथून एक बंबचा वापर केला. जवळच्या एका हॉटेलातून बंबमध्ये पाणी भरुन आग विझविण्यात आली. अग्निशामक दलाचे सतीश साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पेश नाईक, एम.व्ही वेळीप, जी. जोशी, एम . आर. वरक ,जी.एस. नाईक एन. जी नाईक यांनी आग विझविण्याची कामगिरी बजाविली.