सोनसडो कचरा यार्डाला लागलेली आग तिसऱ्या दिवशीही धुमसतीच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 05:58 PM2019-05-29T17:58:23+5:302019-05-29T17:59:57+5:30
मुंबईतील कंपनीच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न
मडगाव: सोनसडो कचरा यार्डाला लागलेली आग सतत तिसऱ्या दिवशीही धुमसत राहिल्याने या भागात प्रचंड धुराचे लोट पसरले आहेत. त्यामुळे स्थानिक हैराण होऊन त्यांनी पालिका प्रशासनाला याबाबत जबाबदार धरले. दरम्यान ही आग आटोक्यात आणण्यासाठी मुंबईच्या ट्रंकविल स्पेशालिटी या कंपनीचे सहकार्य घेतले असून रेन्झाईम रसायनाचा पाणी मिश्रीत फवारा मारुन ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु होता.
सोमवारी दुपारी ही आग लागली होती. या कचरा यार्डात कचऱ्याच्या प्रचंड राशी असून त्या कचऱ्याने पेट घेतल्याने मागचे तीन दिवस ही आग धुमसत आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी आणखी दोन हजार लिटर रेन्झाईम रसायन मुंबईहून मागवण्यात आले आहे.
स्थानिक आमदार व उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी बुधवारी घटनास्थळाला भेट देऊन स्थितीची पहाणी केली. यावेळी त्यांना स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. तीन दिवस आग धुमसत आहे आणि अद्याप त्यावर तोडगा निघत नाही याबद्दल स्थानिकांनी प्रशासनाला जबाबदार धरले.
अग्नीशमन दलाने दिलेल्या माहितीप्रमाणे, या यार्डातील कचऱ्याची रास बरीच मोठी असल्यामुळे आणि दुपारच्या वेळेस वारा वाहत असल्यामुळे आग आटोक्यात आणणे अडचणीचे ठरत आहे. अशातच सगळ्या परिसरात धुराचे साम्राज्य पसरल्याने स्थानिकांना समस्यांना सामोर जावे लागत आहे.