आदर्शनगर, चिखली येथे लागलेल्या आगीत ९ वाहनांचे नुकसान; दोन चारचाकी जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 08:01 PM2020-01-06T20:01:51+5:302020-01-06T20:03:10+5:30
वास्को अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहीतीनुसार सोमवारी पहाटे ३.१५ च्या सुमारास सदर घटना घडली.
वास्को: दक्षिण गोव्यातील सोमवारी पहाटे आदर्शनगर, चिखली भागात असलेल्या रस्त्यावर उभ्या करून ठेवलेल्या ‘वॅगनोर’ चारचाकीत शोर्टसरकीट होऊन वाहनातील ‘बॅट्री’ चा स्फोट होऊन लागलेल्या आगीत त्या ‘वॅगनार’ सहीत अन्य एक चारचाकी जळून खाक झाली. तसेच सदर घटनेत येथे उभ्या करून ठेवलेल्या अन्य वाहनापैंकी पाच दुचाकी व अन्य दोन वाहनांना आगीची झळ बसल्याने त्या वाहनांची बरीच नुकसानी झाली असल्याची माहीती वास्को अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
वास्को अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहीतीनुसार सोमवारी पहाटे ३.१५ च्या सुमारास सदर घटना घडली. आदर्शनगर, चिखली येथील अशीर रस्त्यावर उभ्या करून ठेवलेल्या ‘वॅगनोर’ (क्र: जीए ०६ डी ८४५७) तसेच ‘स्वीफ्ट’ (क्र: जीए ०६ इ २९१६) चारचाकीला भयंकर आग लागली. या आगीची माहीती मिळताच वास्को अग्निशामक दलाच्या जवानांनी बंबासहीत त्वरित घटनास्थळावर धाव घेतली. ही आग भयंकर असून यामुळे येथे उभ्या असलेल्या अन्य वाहनांना सुद्धा धोका निर्माण होणार असल्याचे दिसून येताच या आगीवर नियंत्रण आणण्याच्या कामाला दलाच्या जवानांनी सुरवात करून सुमारे ४५ मिनीटाच्या अथक प्रयत्नानंतर दोन्ही वाहनांना लागलेली आग विझवली.
याबाबत अधिक माहीती घेण्यासाठी वास्को अग्निशामक दलातील सूत्रांना संपर्क केला असता येथे उभ्या असलेल्या ‘वॅगनोर’ चारचाकीला प्रथम आग लागल्याचे तपासणीत समजले असल्याची माहीती त्यांनी दिली. ही आग शोर्टसरकीट झाल्यानंतर त्या चारचाकीत असलेल्या ‘बॅट्री’ चा स्फोट होऊन आग लागल्याचे प्रथम चौकशी वेळी जाणवले असल्याची माहीती अग्निशामक दलाने पुढे दिली.
सदर चारचाकीला आग लागल्यानंतर तिच्या जवळच उभ्या करून ठेवलेल्या त्या ‘स्वीफट’ चारचाकीला सुद्धा आगीने पेट घेऊन या घटनेत दोन्ही चारचाकी जळून खाक झाल्या. याबरोबरच येथे उभ्या करून ठेवलेल्या अन्य ७ वाहनांना आगीची झळ बसल्याने सदर वाहनांची बरीच नुकसानी झाली असून या वाहनात ५ दुचाकी तसेच एक मिनी टेंम्पो व अन्य एका ‘ए स्टार’ चारचाकीचा समावेश असल्याची माहीती अग्निशामक दलाच्या सूत्रांकडून मिळाली. आदर्शनगर, चिखली येथे लागलेल्या या आगीच्या घटनेत एकूण ९ वाहनांना नुकसानी झालेली असून एकूण केवढे नुकसान झाले आहे हे जरी स्पष्ट झाले नसलेतरी सदर लाखो रुपयांची नुकसानी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीत जळून खाक झालेली ती ‘वॅगनोर’ चारचाकी मफाल मार्टीन यांच्या मालकीची असून ‘स्वीफ्ट’ चारचाकी रवी धोत्रे यांच्या मालकीची असल्याची माहीती सूत्रांनी दिली.
सदर घटना पहाटे घडल्याने यावेळी येथे कोणीही नसल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. तसेच घटना घडलेल्या स्थळापासून थोड्याच अंतरावर विद्यालय असून पहाटेच्या वेळी सदर घटना घडल्याने येथे होणारा पुढचा अनर्थ टळल्याची प्रतिक्रीया याभागात राहणाऱ्या काही नागरीकांनी व्यक्त केली. आदर्शनगर भागात लागलेल्या या आगीबाबत येथे राहणाऱ्या काही नागरीकांना कळताच त्यांनी त्वरित अग्निशामक दलाला घटनास्थळावर बोलवून आग विझवल्याने पुढची नुकसानी टळली. वास्को पोलीसांनी त्वरित घटनास्थळावर धाव घेऊन सदर घटनेचा पंचनामा केला असून याप्रकरणात ते अधिक तपास करीत आहेत.