गोळीबार प्रकरण: निलेशच्या पोलिस रिमांडात वाढ: १० नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी
By सूरज.नाईकपवार | Published: November 6, 2023 05:15 PM2023-11-06T17:15:50+5:302023-11-06T17:16:16+5:30
गोव्यातील दक्षिण गोव्यातील रालोय कुडतरी गोळीबार प्रकरणात मायणा कुडतरी पोलिसांनी अटक केलेल्या निलेश वेर्णेकर याच्या पोलिस रिमांडात वाढ झाली आहे.
मडगाव : गोव्यातील दक्षिण गोव्यातील रालोय कुडतरी गोळीबार प्रकरणात मायणा कुडतरी पोलिसांनी अटक केलेल्या निलेश वेर्णेकर याच्या पोलिस रिमांडात वाढ झाली आहे. आता तो शुक्रवार दि. १० रोजी पर्यंत पोलिस कोठडीत असेल.आज सोमवारी त्याची पाेलिस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयात रिमांडसाठी उभा केला असता, त्याला न्यायालयाने वरील पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, संशयिताने जामिन अर्जासाठी केलेल्या अर्जावरही आता बाल न्यायालयात दि. १० रोजी सुनावणी होणार आहे.
मागच्या आठवडयातबुधवारी रात्री रालोय-कुडतरी येथे गोळीबाराचा थरार घडला होता. या प्रकरणात पोलिसांनी ब्लॅक टायगर या सुरक्षा एजन्सीचा मालक नीलेशला गुरुवारी रात्री अटक केली होती. त्याचे अन्य दोन साथीदार अजूनही फरार आहेत. त्यांच्या मागावर सदया पोलिस आहेत.
निलेश याचा रक्तदाब वाढल्याने त्याला येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात पोलिसांनी दाखल केले होते. नंतर त्याला रुग्णालयातून डिसचार्ज मिळाल्यानंतर पोलिसांनी पुन्हा त्याची रवानगी पोलिस कोठडीत केली होती. पोलिस तपासात तो त्रुटक माहिती देत आहेत. मायणा कुडतरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत भगत पुढील तपास करीत आहेत.