गोमेकॉत पहिल्याच दिवशी २४ टक्के, सरकारी इस्पितळांमध्ये परप्रांतीयांना शुल्क आकारणी सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 09:46 PM2018-01-01T21:46:07+5:302018-01-01T21:46:10+5:30
परप्रांतीय रुग्णांना गोमेकॉ तसेच राज्यातील अन्य तीन मिळून एकूण चार सरकारी इस्पितळांमध्ये वैद्यकीय उपचार, शस्रक्रिया तसेच रक्तचाचण्या व इतर चाचण्यांसाठी आजपासून शुल्क आकारणी सुरु झाली
पणजी : परप्रांतीय रुग्णांना गोमेकॉ तसेच राज्यातील अन्य तीन मिळून एकूण चार सरकारी इस्पितळांमध्ये वैद्यकीय उपचार, शस्रक्रिया तसेच रक्तचाचण्या व इतर चाचण्यांसाठी आजपासून शुल्क आकारणी सुरु झाली. गोेमेकॉत पहिल्याच दिवशी २४ टक्के बिगर गोमंतकीय रुग्णांना दाखल केले तर बाह्य रुग्ण विभागात आलेले परप्रांतीय १९ टक्के होते. या सर्व रुग्णांवर सशुल्क उपचार करण्यात आले.
गोमेकॉतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुल्क स्वरुपात सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत दिवसभरात सुमारे २ लाख ७0 हजार रुपये तिजोरीत आले. नोंदणी शुल्क १00 रुपये करण्यात आले असून त्यानूत १६,८00 रुपये प्राप्त झाले.
बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) १६८ नवे रुग्ण आले. त्यात ११३ गोमंतकीय तर ५५ परप्रांतीय होते. कर्नाटकचे १६ तर महाराष्ट्राचे ११ रुग्ण होते तर इतर बिहार तसेच अन्य राज्यांमधील होते. ८८६ जुन्या रुग्णांनी ओपीडीत भेट दिली त्यात ६९0 गोमंतकीय तर उर्वरित परप्रांतीय होते. १0१ नव्या रुग्णांना इस्पितळात उपचारासाठी दाखल करुन घेण्यात आले त्यात २४ बिगर गोमंतकीय आहेत आणि त्यांना युरॉलॉजी, आॅर्थोपेडिक आदी वेगवेगळ्या शस्रक्रियांसाठी दाखल केलेले आहे.
दरम्यान, गोमेकॉचे डीन डॉ. प्रदीप नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार बाह्य रुग्ण विभागाचे पाच कक्ष तसेच अतिरिक्त दोन मिळून एकूण सात कक्षांवर शुल्क आकारणीची प्रक्रिया होईल त्यासाठी अतिरिक्त कर्मचारीही नेमण्यात आलेले आहेत. रक्त चांचण्या, अल्ट्रासाउंड, एक्स रे, एमआरआय, सीटी स्कॅन आदींसाठी तसेच वेगवेगळ्या शस्रक्रियांसाठी शुल्क आकारणी सुरु झाली आहे.