नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात तब्बल 3.32 लाखांचे अंमली पदार्थ जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 04:18 PM2017-11-14T16:18:46+5:302017-11-14T16:18:58+5:30
मडगाव: गोव्यात पर्यटन मोसम सध्या तेजीत असताना केवळ कळंगूट-बागा या पट्ट्यांतच अंमली पदार्थ वाढलेले नसून दक्षिण गोव्यातही अंमली पदार्थाचे लोण पसरले आहे.
मडगाव: गोव्यात पर्यटन मोसम सध्या तेजीत असताना केवळ कळंगूट-बागा या पट्ट्यांतच अंमली पदार्थ वाढलेले नसून दक्षिण गोव्यातही अंमली पदार्थाचे लोण पसरले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या 13 दिवसांत ड्रग्ज विषयक दहा गुन्हेगारी प्रकरणे नोंद झाली असून त्यातील विशेष बाब म्हणजे त्यापैकी आठ प्रकरणे मडगाव, वास्को या दक्षिण गोव्यातील भागातील आहेत. या दहापैकी आठ प्रकरणे गांजाशी निगडित आहेत.
सोमवारी दक्षिण गोव्यात वेर्णा व मडगाव येथे अशाच प्रकारची दोन प्रकरणे उघडकीस आली. रविवारी मध्यरात्री वेर्णा पोलिसांनी वेर्णा भागात गांजा विकत असताना मूळ झारखंड येथील नमितकुमार गोपे या 22 वर्षीय युवकाला अटक करून त्याच्याकडून 65 हजार रुपयांचा गांजा पकडला होता. तर सोमवारी रात्री मडगाव पोलिसांनी मडगावच्या मोतीडोंगर या झोपडपट्टीत राहणा-या बिनबंधू साहू या 32 वर्षीय मूळ ओडिशाच्या हमालाला अटक करून त्याच्याकडून 13 हजाराचा गांजा जप्त केला.
आतापर्यंत पहिल्या 13 दिवसांत नोंद झालेल्या दहा प्रकरणात एकूण 12 जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून 3.32 लाख रुपयांचे अंमलीपदार्थ जप्त केले आहेत. अटक केलेल्यांमध्ये चार गोमंतकीय, पाच बिगर गोमंतकीय यांच्यासह अन्य तीन नायजेरियनांचा समावेश आहे. गोव्यात येणारा हा गांजा केरळ व कर्नाटक या मार्गातून विशेषत: रेल्वेतून येत असल्याचा निष्कर्ष गोवा पोलिसांनी काढला आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या 3 तारखेला मडगाव व वास्को येथे अशा प्रकारच्या दोन घटना घडल्या होत्या. मडगाव पोलिसांनी गोपाळ गोगोई या आसामी सुरक्षारक्षकाला अटक करून त्याच्याकडून 39 हजारांचा गांजा जप्त केला होता. त्याच दिवशी वास्को पोलिसांनी दोन महाविद्यालयात शिकणा-या युवकांना 15 हजारांच्या गांजासह रंगेहात पकडले होते.
4 नोव्हेंबरला कळंगूट पोलिसांनी आगुस्तीन डिसोझा या 34 वर्षीय युवकाला अटक करून त्याच्याकडून 10 हजारांचे हेरॉईन जप्त केले होते. तर 5 नोव्हेंबर रोजी वास्को येथे सुभाषचंद्र यादव या उत्तर प्रदेशच्या इसमाला अटक करून त्याच्याकडून 10 हजारांचा गांजा जप्त केला होता. यातील नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे मडगाव व वास्को ही दोन्ही शहरे रेल्वेला जोडली गेली आहेत. 7 नोव्हेंबर रोजीही गोव्यात अंमली पदार्थाच्या दोन प्रकरणांची नोंद झाली होती. मडगाव पोलिसांनी महादेव शेटकर या बसचालकाला अटक करून त्याच्याकडून 10 हजारांचा गांजा जप्त केला होता. त्याच दिवशी कळंगूट पोलिसांनी क्रिस ओव्हेरा या 25 वर्षीय नायजेरियनाला कांदोळी येथे अटक करून त्याच्याकडून 5 हजारांचा गांजा जप्त केला होता.
11 नोव्हेंबर रोजी विनोद शर्मा या महाराष्ट्रातील इसमाला पणजी पोलिसांनी अटक करुन त्याच्याकडून दीड लाखाचा गांजा जप्त केला. 12 नोव्हेंबरला मायकल ओकेरो व आदिलेक खलिद या दोन नायजेरियनाना कांदोळी येथे अटक करून त्यांच्याकडून 15 हजारांचा गांजा जप्त केला.