गोव्यात वाघांच्या संरक्षणाबाबत प्रथमच गांभीर्य, उपाययोजना सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 12:19 PM2020-02-11T12:19:25+5:302020-02-11T12:19:44+5:30
गोव्यातील म्हादई अभयारण्यात चार पट्टेरी वाघांची हत्त्या झाल्यानंतर आता प्रथमच येथील वन खात्याने वाघांच्या संरक्षणाचा विषय गंभीरपणो घेतलेला दिसून येत आहे.
पणजी : गोव्यातील म्हादई अभयारण्यात चार पट्टेरी वाघांची हत्त्या झाल्यानंतर आता प्रथमच येथील वन खात्याने वाघांच्या संरक्षणाचा विषय गंभीरपणो घेतलेला दिसून येत आहे. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने वन खात्याची अनास्था आपल्या अहवालातून दाखवून दिली आहे. वन खाते आता सक्रिय झाले असून म्हादई अभयारण्यात प्रथमच दोन शिकारविरोधी तळ उभे केले जाणार आहेत.
गोव्यातील म्हादई अभयारण्य हे 208 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचे आहे. या अभयारण्यात कर्नाटकमधूनही वाघ येतात. जर म्हादई अभयारण्यात वाघांच्या संरक्षणासाठी पाऊले उचलली नाहीत तर पट्टेरी वाघांसाठी गोवा राज्य मृत्यूचा सापळा बनेल, असे राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने म्हटले आहे. वन खात्याने यापूर्वी वाघांच्या संरक्षणासाठी गंभीर उपाययोजना केली नाही हेही प्राधिकरणाने आपल्या चौकशी अहवालात नमूद केले आहे.
गोव्यातील चार वाघांवर विष प्रयोग करून मारले गेल्यानंतर केंद्रीय चौकशी पथक गोव्यात आले होते. त्या पथकाने गोव्याच्या वन खात्याचे कान पिळल्यानंतर आता वन खात्याने म्हादई अभयारण्यात दोन शिकारविरोधी तळ उभे करण्यासाठी जागा निश्चीत केली आहे. म्हादई अभयारण्यात तीन वाघ अजून असल्याचे सरकारचे म्हणणो आहे. गोव्यातील म्हादई अभयारण्य हे वाघांसाठी कॉरिडॉर झालेले आहे. कर्नाटकमधील काली व्याघ्र प्रकल्प व भीमगड अभयारण्यातून वाघ गोव्यात येतात.
म्हादई अभयारण्यात दोन तळ उभे केल्यानंतर रात्रीच्यावेळीही वन रक्षक अभयारण्यात राहू शकतील. सध्या रात्रीच्यावेळी अभयारण्यात कुणाचा पहारा नसतो. वाघांनी दोघा शेतकऱ्यांच्या दुभत्या जनावरांवर हल्ला केल्यानंतर विषप्रयोग करून त्या शेतकऱ्यांनी वाघांची हत्त्या केली. पाचजणांना या प्रकरणी आतार्पयत अटक झाली. गोवा विधानसभेतही या घटनेचे पडसाद उमटले. वाघ हत्त्येची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. या सगळ्य़ा पाश्र्वभूमीवर वन खात्याने वाघ संरक्षणाचा विषय गंभीरपणो घेतला आहे. गोव्यात व्याघ्र प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव नव्याने सरकारसमोर मांडला जाऊ शकतो.