गोव्यात ‘टिक टॉक’चा पहिला बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:29 AM2019-04-24T00:29:56+5:302019-04-24T00:31:19+5:30
मानेची धमनी तुटली : स्टंट शूट करीत असताना केरी-साळजिणीतील विद्यार्थ्याचे निधन
काणकोण : मोबाइलवर ‘टिक टॉक’वर स्टंट करीत असताना मानेची धमनी (शीर) तुटल्याने मूळ केरी-साळजिणी येथील युवकाचे सोमवारी सायंकाळी निधन झाले.
अर्धफोंड येथील बलराम उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता अकरावी वाणिज्य शाखेत शिकणारा सूरज रमेश गावकर (१७) सोमवारी सायंकाळी दाबेल-पैंगीण येथील आपल्या आत्याच्या घरी मोबाइलवर ‘टिक टॉक’ अॅपवर स्टंट शूट करीत होता. स्टंट करीत असतानाच त्याच्या मानेची धमनी तुटून त्याचा मृत्यू झाला. याची माहिती पोलिसांना दिल्यावर काणकोण पोलिसांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मंगळवारी सायंकाळी त्याच्यावर केरी येथे अंतिम संस्कार करण्यात आले. मनमिळावू स्वभावाचा असलेला सूरज हुशार विद्यार्थी होता, असे या विद्यालयाचे प्राचार्य कमलाकर म्हाळशी यांनी सांगितले. सूरजच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्याकरिता विविध क्षेत्रातील मान्यवर त्याच्या निवासस्थानी उपस्थित होते. त्याच्या पश्चात आई, वडील व बहिणी असा परिवार आहे.
काय आहे टिक टॉक...?
सोशल मीडियात प्रचंड क्रेझ असणाºया टिक टॉक अॅपवर हल्लीच बंदी आणण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. गुगलला प्ले स्टोअरमधून टिक टॉक अॅप काढण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता हा अॅप डाउनलोड करता येणार नाही. मात्र, ज्या लोकांकडे आधीपासून हा अॅप आहे, त्यांना तो पहिल्यासारखा वापरता येतो. टिक टॉक अॅप तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. मात्र, काही जण या अॅपचा गैरवापर करून, अश्लील चित्रफितींना प्रोत्साहन देतात, असा आरोप करत त्याविरोधात मद्रास उच्च न्यायालयाने याचिका दाखल झाली होती. न्यायालयाने या अॅपवर बंदीचा निर्णय दिला. त्यानंतर टिक टॉकने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तिथेही मद्रास न्यायालयाचा निर्णय जैसे थे ठेवण्याचा निर्णय झाला. कंपनीने वर्षभरात ६० लाख पेक्षा अधिक व्हिडीओ टिक टॉकच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले आहेत. मुळात म्युझिकली नाव असणाºया अॅपचे नाव टिक-टॉक करण्यात आले. भारतात सध्या ९ कोटी लोक टिक टॉक अॅप वापरतात, असा अंदाज आहे. जगभरात १00 कोटी लोकांनी हा अॅप डाउनलोड केला आहे.