मासळी व्यापाऱ्यांना एफडीएकडे नोंदणी, वाहतुकीसाठी इन्सुलेटेड वाहन सक्तीचेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 07:22 PM2018-10-25T19:22:39+5:302018-10-25T19:23:01+5:30
मासळी व्यापा-यांसाठी अन्न व औषध प्रशासनाकडे नोंदणी तसेच मासळीच्या वाहतुकीसाठी इन्सुलेटेड वाहने वापरण्याच्या सक्तीवर सरकार ठाम आहे.
पणजी : मासळी व्यापा-यांसाठी अन्न व औषध प्रशासनाकडे नोंदणी तसेच मासळीच्या वाहतुकीसाठी इन्सुलेटेड वाहने वापरण्याच्या सक्तीवर सरकार ठाम आहे. मासळीच्या आयातीवर बंदी घातलेली नाही. परराज्यातील व्यापा-यांना त्यांच्या राज्यात एफडीएकडे नोंदणी करावी लागेल. स्थानिक मासळी व्यापा-यांनाही नोंदणी सक्तीची आहे त्यासाठी पालिका, पंचायतींकडून ना हरकत दाखलेही प्राप्त करावे लागतील. दरम्यान, मासळी तसेच अन्य वस्तू तपासण्यासाठी दक्षिण गोव्यातही प्रयोगशाळा उघडण्यात येईल.
पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी ही माहिती दिली. मडगांवच्या घाऊक मासळी बाजारातील ३३ व्यापा-यांचे परवाने मागे घेतल्याच्या कृतीचे त्यांनी समर्थन केले. ते म्हणाले की, ‘२ आॅगस्ट रोजी काढलेल्या आदेशाचे सर्व मासळी व्यापा-यांना कठोरपणे पालन करावे लागेल. अन्न सुरक्षा आयुक्त या नात्याने आरोग्य सचिवांना याबाबत अंमलबजावणीचे सक्त निर्देश देण्यात आलेले आहेत. ते उच्चस्तरीय बैठक घेतील.’
विश्वजित म्हणाले की, ‘मासळी व्यापा-यांना नोंदणीसाठी १५ दिवसांची मुदत वाढवून दिली तरी प्रतिसाद मिळालेला नाही. कोणीच मासळी व्यापा-याने नोंदणी केलेली नाही. सरकार हमीपत्र वगैरे काही घेणार नाही. प्रत्येक मासळी व्यापा-याला वरील आदेशाप्रमाणे मार्गदर्शक तत्त्वें पाळावीच लागतील.’
नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई हे याबाबतीत आपल्या संपर्कात आहेत. दक्षिण गोव्यातही प्रयोगशाळा व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. त्यासाठी आम्ही जागा शोधत आहेत. क्वालिटी इन्स्पेक्शन एजन्सी ही आंतरराष्ट्रीय यंत्रणा केेंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या सहयोगाने उत्तर गोव्यात प्रयोगशाळा उघडणार आहे. तशीच प्रयोगशाळा दक्षिण गोव्यातही उघडली जाईल. केवळ मासळीच नव्हे तर भाजीपाला, फळे, दूधही तपासले जाईल. राज्यात रोज सुमारे १ लाख १५ हजार लिटर दुधाच आयात होते. भेसळ तपासण्यासाठी दुधाचेही नमुने एफडीएकडून वरेचवर घेतले जातात. ही तपासणी चालूच आहे त्यामुळे कोणी मनात भीती बाळगण्याचे कारण नाही. मासळीच्या बाबतीत विरोधी पक्ष राजकीय भांडवल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
‘सध्या तरी पर्रीकरच मुख्यमंत्री’
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीविषयी विचारले असता त्यावर पर्रीकर भाष्य करण्याचा अधिकार पर्रीकर यांच्या कुटुंबियांनाच आहे, असे नमूद करुन त्यांनी बोलण्याचे टाळले. पर्रीकर हे गोमेकॉतील डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत, असे ते म्हणाले. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीबद्दल विचारले असता सध्या तरी पर्रीकर हेच मुख्यमंत्री आहेत, असे ते उत्तरले.