मासळीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी गोव्यात लवकरच मच्छिमारी महामंडळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 08:51 PM2019-07-15T20:51:40+5:302019-07-15T20:51:57+5:30
मासळीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार लवकरच मच्छिमारी महामंडळ स्थापन करणार असल्याची लेखी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेत लेखी उत्तरातून दिली आहे.
पणजी - मासळीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार लवकरच मच्छिमारी महामंडळ स्थापन करणार असल्याची लेखी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेत लेखी उत्तरातून दिली आहे.
महामंडळ स्थापन करण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे, असे सावंत यांनी आमदार रेजिनाल्द लॉरेन्स यांच्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे. मच्छिमारांना खास करुन ट्रॉलरमालकांना सरकारकडून इंधनावर तसेच अन्य गोष्टींवर सबसिडी दिली जात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
रेजिनाल्द यांनी परप्रांतीय ट्रॉलर्स गोव्याच्या सागरी हद्दीत अतिक्रमण क रतात याकडेही लक्ष वेधले होते. सध्या राज्यात मासेमारीबंदी आहे त्यामुळे परप्रांतीय ट्रॉलर्स घुसखोरी करतात, असे त्यांचे म्हणणे होते यावर सावंत यांनी लेखी उत्तरात असेही स्पष्ट केले आहे की, मान्सूनमध्ये मासेमारीबंदीच्या काळात मच्छिमारी संघटनांना समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे बजावले जाते. तटरक्षक दल, पोलिसांना याबाबत सतर्क राहण्याचे निर्देश दिले जातात.