एलईडी मासेमारीवर कारवाईसाठी मच्छिमारी खात्याकडे पुरेशी यंत्रणा नाही, मंत्र्याची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 10:22 PM2020-02-19T22:22:08+5:302020-02-19T22:22:21+5:30
एलईडी मासेमारीवरील बंदीच्या नियमांचे पालन केले जात नाही, असा त्यांचा आरोप होता आणि ही मासेमारी बंद झाली नाही तर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता.
पणजी : एलईडी मासेमारीवर कारवाईसाठी मच्छिमारी खात्याकडे पुरेशी यंत्रणा नाही, अशी कबुली खात्याचे मंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्स यांनी दिली. पारंपरिक मच्छिमारांच्या शिष्टमंडळाने बुधवारी त्यांची भेट घेतली असता येत्या १५ दिवसात तटरक्षक दल, बंदर कप्तान तसेच सागरी पोलिसांच्या मदतीने अशा ट्रॉलर्सवर कारवाई सुरु करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
गोंयच्या रांपणकारांचो एकवोट संघटनेच्या नेत्यांनी बुधवारी मंत्र्यांची भेट घेतली. एलईडी मासेमारीवरील बंदीच्या नियमांचे पालन केले जात नाही, असा त्यांचा आरोप होता आणि ही मासेमारी बंद झाली नाही तर आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला होता. राज्य सरकारने २0१७ साली एलईडी मासेमारी तसेच बूल ट्रॉलिंगवर बंदी घातली. मात्र या बंदीचे पालन केले जात नाही, अशी तक्रार आहे.
मंत्री म्हणाले की, ‘खात्याकडे पुरेशी यंत्रणा नसल्याने कारवाईसाठी तटरक्षक दल, पोलिस आदींची मदत घ्यावी लागेल. जेटींवर बेवारस सोडलेले काही ट्रॉलर्स आहेत त्यामुळेही समस्या निर्माण झालेली आहे. या ट्रॉलरमालकांना खात्याकडून नोटिसा जारी केल्या जातील.
दरम्यान, एलईडी मासेमारीवर कडक कारवाई केली जावी अशी मागणी बंदर कप्तानमंत्री मायकल लोबो यांनी अलीकडेच केली होती.