मासळीची आयात बंद, 50 ट्रक परत पाठविले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 06:50 PM2018-10-27T18:50:40+5:302018-10-27T18:51:53+5:30
परप्रांतांमधून गोव्यात येणारी मासळीची आयात शनिवारपासून पुन्हा बंद झाली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून मासळीवाहू सुमारे 50 ट्रक सीमेवरून परत पाठविले गेले.
पणजी : परप्रांतांमधून गोव्यात येणारी मासळीची आयात शनिवारपासून पुन्हा बंद झाली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून मासळीवाहू सुमारे 50 ट्रक सीमेवरून परत पाठविले गेले. अगोदर अन्न व औषध प्रशासन खात्याकडे नोंदणी करून घ्या, मासळीसाठी इन्सुलेटेड वाहने वापरा आदी सूचना सरकारने केल्या असून या सूचनांचे पालन केले जात नसल्याने मासळीवाहून वाहने गोव्याच्या यंत्रणोकडून गोव्यात येऊ दिली जात नाहीत.
आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी एफडीएच्या संचालक ज्योती सरदेसाई यांच्यासोबत शनिवारी येथे पत्रकार परिषद घेतली. राणे यांनी सांगितले, की गोव्यात रोज सरासरी 82 मासळीवाहू ट्रक किंवा तत्सम वाहने येतात. ही मासळी बाजारपेठेत स्थानिक व घरगुती वापरासाठी जाते. हॉटेलांनाही याच मासळीचा पुरवठा होतो. या शिवाय सुमारे 100 वाहने मासळी घेऊन येथील कारखान्यांना पुरवठा करतात. कारखान्यांमधून मासळीची निर्यात होते. ह्या शंभर वाहनांना आम्ही अटकाव करत नाही पण स्थानिक बाजारपेठेसाठी जी मासळी येते, ती मासळी इन्सुलेटेड वाहनांमधूनच यायला हवी व त्यांची नोंदणी संबंधित राज्यातील एफडीए व गोव्यातील एफडीएकडेही असायला हवी. जे परिपत्रक गेल्या महिन्यात जारी करण्यात आले होते, त्याचे पालन व्हायला हवे.
मंत्री राणे म्हणाले, की पत्रदेवी, पोळे अशा तपासनाक्यांवर पोलीस गस्त घालत आहेत. यापुढे दोडामार्ग, केरी, मोले या तपास नाक्यांवरही पोलिसांनी लक्ष ठेवावे अशी सूचना आम्ही पोलीस खात्याला केली आहे. कारण गोव्यातील कोणत्याच मार्गावरून मासळी आत येऊ नये. मासळीत फॉर्मेलिनचा वापर होऊ नये म्हणून तपासणी केली जाईलच. आज रविवारी एफडीए काही बाजारपेठांनाही भेटी देईल. अन्य कुठून परप्रांतांमधील मासळी गोव्याच्या बाजारात पोहचलेली नाही ना हे तपासून पाहिले जाईल.
राज्यातील पंचतारांकित हॉटेल्सना मासळीची गरज आहे हे आम्हाला ठाऊक आहे. हॉटेलांशी आम्ही सहकार्य करू पण एफडीएकडे नोंदणी करणो व इन्सुलेटेड वाहने वापरणे यासाठी आम्ही आणखी मुदतवाढ देऊ शकत नाही. सरकारी परिपत्रकातील सूचनांचे पालन मासळी व्यापा-यांना करावेच लागेल, असे मंत्री राणे म्हणाले. व्यापा-यांकडे पालिका-पंचायतीचे आवश्यक परवाने असणे गरजेचे आहे. कुणाला संप करायचा असेल तर संप करू द्या. मासळी तपासण्यासाठी मडगाव परिसरात प्रयोगशाळा उभी केली जाईल. सोमवार किंवा मंगळवारी आम्ही जाऊन तिथे जागेची पाहणी करू, असे राणे यांनी नमूद केले.