मासळीच्या वादाला सरकार कंटाळले, आयवा यांची नियुक्ती करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 08:43 PM2018-12-08T20:43:18+5:302018-12-08T20:43:37+5:30
राज्यातील मासळीच्या वादाला व लोकांमध्ये निर्माण झालेल्या मोठ्या संशयाला एफडीए खाते तथा पूर्ण सरकारच सध्या कंटाळले आहे.
पणजी : राज्यातील मासळीच्या वादाला व लोकांमध्ये निर्माण झालेल्या मोठ्या संशयाला एफडीए खाते तथा पूर्ण सरकारच सध्या कंटाळले आहे. शेवटचा उपाय म्हणून सरकारने आता एफडीएच्या अधिकारी आयवा फर्नाडिस यांचीच नियुक्ती मडगावच्या घाऊक मासळी मार्केटमध्ये मासळी तपासण्यासाठी तसेच सीमेवरही मासळी तपासण्यासाठी करण्याचे ठरवले आहे.
आयवा यांनीच काही महिन्यांपूर्वी सर्वप्रथम भल्या पहाटे मडगावच्या घाऊक मासळी मार्केटमध्ये छापा टाकून चाचणी केली होती व त्या चाचणीवेळी माशांमध्ये फॉर्मेलिन असल्याचे आढळले असे जाहीर केले होते. मात्र नंतर प्रयोगशाळेत नेऊन त्याच माशांवर चाचणी केली केली तेव्हा तिथे माशांमध्ये फॉर्मेलिन आढळले नाही. प्रयोगशाळेतील निष्कर्षापूर्वीच एका राजकीय नेत्याने सोशल मिडियावरून निष्कर्ष जाहीर केल्यानंतर राज्यात वाद निर्माण झाला. विरोधी काँग्रेसने तर या विषयावरून विधानसभेचे कामकाज काही दिवस रोखून धरले होते. गोव्याबाहेरून आणली जाणारी मासळी ताजी राहावी म्हणून व्यापारी मासळीमध्ये फॉर्मेलिन हे घातक रसायन वापरतात अशा प्रकारची भीती लोकांमध्ये निर्माण झाली व ही भीती दूर होऊ शकली नाही. सरकारने दोनवेळा मासळी आयात बंदी लागू केली. एफडीएच्या सूचनांचे पालन करून व अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत आवश्यक परवाने घेऊन मगच इनसुलेटेड वाहनांद्वारे मासळी गोव्यात आणावी असे एफडीएने ठरवून दिले. त्यानुसार काही ट्रक मासळी गेल्या दोन दिवसांत गोव्यात आली. माशांमध्ये फॉर्मेलिन असत नाही असे एफडीएने अलिकडेही वारंवार केलेल्या तपासणीवेळी आढळून आले. लोकांनी एफडीएवर विश्वास ठेवावा म्हणून आयवा फर्नाडिस यांचीच नियुक्ती आता मडगावच्या बाजारपेठेत व सीमांवरही मासळी तपासण्यासाठी केली जाईल. आरोग्य मंत्री विश्वजित राणो यांनी शनिवारी लोकमतशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. ट्रेडर्सनी एफडीएला गृहीत धरू नये, जे नियमांचे पालन करतील त्यांनाच मासळी गोव्यात आणता येईल, असे राणो म्हणाले.