बांगड्यांची आवक वाढली, पणजीतील मासळी बाजारात खरेदीसाठी गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 12:17 PM2018-08-02T12:17:59+5:302018-08-02T12:23:13+5:30
राज्यात मासेमारी सुरू झाल्याने बुधवारपासून मासळी मार्केटमध्ये मासे विक्रीस येऊ लागले.
पणजी : समुद्रातून मासळीचे ट्रॉलर्स परतल्यामुळे बाजारात मासळीची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्याने माशांचे दर झटकन उतरले आहेत. दोनशे रुपयांना पाच मिळणारे बांगडे आता आठ ते दहा नग अशा स्वरुपात विकले जात आहेत. त्यामुळे खरेदीदारांचीही गर्दी बाजारात दिसू लागली आहे.
राज्यात मासेमारी सुरू झाल्याने बुधवारपासून मासळी मार्केटमध्ये मासे विक्रीस येऊ लागले. मात्र, खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या ट्रॉलर्स बुधवारी मध्यरात्री तसेच गुरुवारी पहाटे परतल्याने बाजारात मासळीची आवक वाढली. राजधानीच्या मासळी बाजारात वास्कोतील जेटीवरून मासळी दाखल झाली असून यात बांगड्याची आवक मोठी झालेली दिसून आली. स्वस्त झालेली मासळी खरेदी करणाऱ्या ग्राहकांची गर्दी दिसून आली. फार्मोलीनयुक्त मासळीच्या प्रकरणानंतर राज्य सरकारने राज्यात आयात होणाऱ्या मासळीवर पूर्णत: बंदी घातली होती. त्यामुळे गेली दहा-बारा दिवस मासळीचा बाजार ओस पडल्यासारखा दिसत होता.
1 ऑगस्टपासून मासेमारी सुरू झाल्याने स्थानिक मच्छीमार मासळी बाजारात विक्रीस पाठवू लागले आहेत. सध्या बाजारात बांगडे, सुंगटे, लेपो आणि मुंडुशे माशांची आवक झालेली दिसत आहे. त्यात बांगड्यांची आणि सुंगट्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याचा परिणाम दरावर झाला आहे. मासेमारी बंदीच्या काळात बांगडे दोनशे रुपयांना पाच असे विकले जात होते आता त्याठिकाणी 200 रुपयांना आठ ते दहा नग असे विकले जात आहेत. त्यासचबरोबर सुंगट्याचा ढिग 200 रुपयांना दिला जात होता, त्याऐवजी आता 200 ते 300 रुपये किलो अशा दरात सुंगट्यांची विक्री सुरू आहे. सुंगटे मोठ्या प्रमाणात आले आहेत, त्यामुळे ग्राहकांना खरेदीत मोठी चॉईस राहिली आहे. काहीजण बांगडे, सुंगटे आणि लेपो एकत्रितरित्या खरेदी करत असल्याने आम्ही दरही कमी करून त्यांना देतो. इतरवेळी फक्त सुंगटे खरेदी करणार असेल तर त्याला 300 रुपये किंवा 250 रुपये किलोने विकत असल्याची माहिती एका महिला विक्रेत्यांनी दिली.
मासळीचे दर
बांगडे - 200 रुपयांना 10 नग
सुंगटे - 250 ते 300 रुपये किलो
मुंडुशे - 300 रुपये 8 ते 10 (आकारमानानुसार)
लेपो - 300 रुपये किलो.