पाच कॅसिनोंना मांडवीतून हटविणार
By admin | Published: March 28, 2017 03:04 AM2017-03-28T03:04:26+5:302017-03-28T03:05:44+5:30
पणजी : मांडवी नदीतील पाचही कॅसिनो जहाजे अन्यत्र हटवावीत यावर पर्रीकर मंत्रिमंडळाचे सोमवारी एकमत झाले. तूर्त मांडवीत राहण्यासाठी
पणजी : मांडवी नदीतील पाचही कॅसिनो जहाजे अन्यत्र हटवावीत यावर पर्रीकर मंत्रिमंडळाचे सोमवारी एकमत झाले. तूर्त मांडवीत राहण्यासाठी प्रथम तीन महिन्यांची मुदतवाढ या कॅसिनोंना द्यावी असे ठरले. गोल्डन ग्लोब कंपनीचा सहावा तरंगता कॅसिनो गोव्यात नको, अशी भूमिका मंत्री विजय सरदेसाई व रोहन खंवटे यांनी जोरदारपणे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासमोर मांडली. मुख्यमंत्र्यांनाही ती तत्त्वत: पटली.
पर्रीकर मंत्रिमंडळाची दुसरी बैठक सोमवारी सकाळी मंत्रालयात पार पडली. फक्त मांडवीतील तरंगत्या कॅसिनोंचाच एकमेव विषय मंत्रिमंडळासमोर होता. येत्या ३१ रोजी मांडवीतील या कॅसिनोंची मुदत संपते. त्यामुळे सोमवारी बैठक घेतली गेली. गेली पाच वर्षे मांडवीतून कॅसिनो हटविण्याच्या घोषणा होत आहेत; पण कृती मात्र होत नव्हती.
मंत्रिमंडळाच्या बैठकीवेळी या कॅसिनोंबाबत व राज्यातील लोकभावनेबाबत गंभीरपणे चर्चा झाली. येत्या तीन महिन्यांनंतर हे कॅसिनो हटविण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांना दिला. कॅसिनोंसाठी योग्य अशी पर्यायी जागा अगोदर पाहूया आणि मग त्यांना मांडवीबाहेर जाण्यासाठी तीन महिन्यांनंतर धोरण ठरवूया, असे मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना सांगितले. पाचपैकी चार कॅसिनोंच्या परवान्यांची मुदत २०१८ साली संपुष्टात येत आहे. तर डेल्टा प्लेझर क्रुझ कंपनीच्या एम. व्ही. रॉयल फ्लॉटेल या कॅसिनोची मुदत २०१९ मध्ये संपुष्टात येत आहे.