पाच कि. मी. लांबीच्या मांडवी पुलाचे आज गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 05:50 AM2019-01-27T05:50:24+5:302019-01-27T05:50:57+5:30
नव्याने बांधण्यात आलेला हा पूल मांडवी नदीवरील तिसरा पूल असून ५.१ किमी लांबीचा, चार पदरी तसेच केबलधारीत आहे.
नवी दिल्ली : गोवा स्थित मांडवी नदीवरील नवीन पुलाचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या रविवारी होत आहे. नव्याने बांधण्यात आलेला हा पूल मांडवी नदीवरील तिसरा पूल असून ५.१ किमी लांबीचा, चार पदरी तसेच केबलधारीत आहे.
गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा पूल पणजी शहरातील वाहतुकीचा भार कमी करेल. या पुलामुळे बंगळूरूकडून फोंडा मार्गे येणारी व मुंबईकडे जाणारी वाहने पणजी मध्ये येणार नाहीत. पणजी शहरातील कदंबा बसस्थानक परिसरातील वाहनांची गर्दी कमी होईल. सुमारे ६६ हजार वाहने रोज या रस्त्याचा वापर करतात, गोव्यातील पर्यटन काळात व रोजच्या अधिक रहदारीच्या वेळांमध्ये यामुळे वाहतूक समस्या उद्भवत असते.
संपूर्णपणे भारतीय असलेल्या या पुलासाठी १ लाख घनमीटर उच्च शक्ती व कार्यक्षमता असणारे कॉंक्रिट वापरण्यात आले आहे. याशिवाय २० हजार चार चाकींच्या वजनाइतके म्हणजे १३ हजार मेट्रिक टन गंजप्रतिरोधक मजबूत पोलाद, सहा फुटबॉल मैदासाठी आवश्यक इतके ३२ हजार स्क्वेअर मीटर स्ट्रक्चरल स्टील प्लेट्स, गोवा ते दिल्लीचे अंतर व्यापू शकेल इतके म्हणजे १८०० किलोमीटर हाय टेन्सिल प्री-स्ट्रेसिंग स्टील स्ट्रँड, या २ लाख ५० हजार टन जड असलेल्या या ब्रिजसाठी (५७० बोईंग-७४७ जम्बो जेटच्या वजनाइतके) २६५ गोलाकार ब्रिज बियरिंग्ज व ८८ अत्याधुनिक सिंगल प्लेन मधील उच्च टेंसिइल स्ट्रॅटेन्स केबल्स हर्प प्रकार केबल स्टेप सिस्टीम रिअल-टाइम फोर्स मॉनिटरींग टेक्नॉलॉजीसह सुसज्ज या पुलाच्या निर्मितीसाठी वापरण्यात आले आहे.