गोव्यात कोरोनामुळे आणखी पाच जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 06:50 PM2020-08-04T18:50:39+5:302020-08-04T18:50:59+5:30
दोन दिवसांपूर्वीच त्याला मडगावच्या कोविड इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याचा बळी गेला. आल्तिनो येथे तीन व्यक्ती कोविडग्रस्त आढळल्या आहेत.
पणजी : राज्यात कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढतच चालली आहे. मंगळवारी आणखी पाच जणांचा बळी गेला. यात 29 वर्षीय युवकाचाही समावेश आहे. राजधानी पणजीत कोरोनाचा फैलाव सुरूच आहे. पणजीत आणखी दहा कोविडग्रस्त मंगळवारी आढळले. हातुर्ली- मये येथील 40 वर्षीय तरुणाचा मंगळवारी मृत्यू झाला. हा तरुण सावर्डे येथे काम करत होता. चार दिवसांपूर्वीच तो मयेला आला होता. त्याला कोविडची लागण झाल्याचे म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात स्पष्ट झाले. मये मतदारसंघात कोविडचा हा पहिला बळी ठरला आहे. आल्तिनो पणजी येथील एका 29 वर्षीय युवकाचा कोविडमुळेच मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वीच त्याला मडगावच्या कोविड इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याचा बळी गेला. आल्तिनो येथे तीन व्यक्ती कोविडग्रस्त आढळल्या आहेत.
राज्यातील ज्या पाच जणांचे मंगळवारी कोविडमुळे निधन झाले, त्यापैकी दोघे जण मडगावमधील आहेत. 8० वर्षीय व 79 वर्षीय दोघा इसमांचा बळी गेला. यापैकी 79 वर्षीय व्यक्ती ही वाडे वास्को येथील आहे. याशिवाय मडगावमधील 54 वर्षीय कोविड रुग्णाचे निधन झाले. घोगळ येथील 8० वर्षीय पुरुष रुग्णाचाही कोविड इस्पितळात मृत्यू झाला.
पणजीत नवे 10 रुग्ण
पणजीतील मळा भागात मंगळवारी तीन नवे कोविडग्रस्त आढळले. आल्तिनो येथील सद्दाम शेख ह्या युवकाचा कोविडने बळी घेतला.भाटान करंजाळे येथे दोघे आढळळे. मिरामार व पाटो- रायबंदर येथे प्रत्येकी एक आणि आल्तिनोला तीन रुग्ण आढळले. मिरामारला पापाजान रेस्टॉरंटच्या परिसरात 24 वर्षीय युवकाला कोविडची लागण झाली. मळा येथे चाळीस वर्षीय युवतीला तसेच भाटान करंजाळे येथे 31 वर्षीय युवतीला कोविडची लागण झाली आहे. आल्तिनोच्या झोपडपट्टीचा भाग सिल केला गेला आहे.