पाच हजार व्यावसायिकांनी बुडवले तब्बल ६२ कोटींचे कर्ज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2024 10:51 AM2024-07-08T10:51:32+5:302024-07-08T10:53:04+5:30
मुद्रा योजना : २०२१च्या तुलनेत कर्ज वाटपात झाली सुधारणा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : प्रधानमंत्री मुद्रा योजनेत राज्यातील ५,०७६ लहान व्यावसायिकांनी ६२.६३ कोटी रुपये कर्ज बुडवल्याची माहिती पुढे आली आहे. या योजनेतून लहान व्यावसायिकांना 'शिशू', 'किशोर' व 'तरुण' अशा तीन वर्गवारीत कर्ज दिले जाते. केंद्र सरकारने ८ एप्रिल २०१५ रोजी ही योजना सुरू केली होती.
योजनेत लहान व्यावसायिकांना सूक्ष्म व लघू उद्योगांसाठी १० लाख रु. पर्यंत कर्ज दिले जाते. व्यावसायिक बँक, वित्तीय संस्थांकडून कर्ज दिले जाते. आर्थिक सर्वेक्षण अहवालातील माहितीनुसार 'शिशू' वर्गवारीत २,५६९ व्यावसायिक खातेधारकांनी ६ कोटी २२ लाख रुपये कर्ज बुडवले. 'किशोर' वर्गवारीत २०९२ खातेधारकांनी ३२.६० कोटींचे कर्ज बुडवले तर 'तरुण' वर्गवारीत ४१५ खातेधारकांनी २३.८१ कोटी रुपये कर्ज बुडवले.
लाभार्थी ९५ टक्के वाढले...
ही सर्व रक्कम सरकारने आता अधिकृतरित्या बुडीत खात्यात दाखवली आहे. गेली नऊ वर्षे ही योजना कार्यरत आहे. एका पाहणीनुसार २०२१ च्या तुलनेत लाभार्थीचे प्रमाण ९५ टक्क्यांनी वाढले आहे. या योजनेचा लाभ लहानातल्या लहान व्यावसायिकांनी घ्यावा, यासाठी सरकारचे प्रयत्न असून त्यादृष्टीने जागृतीही घडवून आणली जात असल्याचे सांगण्यात आले.
७५६ कोटींचे वितरण
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या २०२३-२४ आर्थिक वर्षाच्या ताज्या माहितीनुसार तिन्ही वर्गवारीत मिळून गोव्यात एकूण ४२,५०५ लहान व्यावसायिकांना आतापर्यंत ७७०,२७ कोटी रुपये कर्ज मंजूर केले. पैकी ७५६.४६ कोटी रुपये वितरित झालेले आहेत. शिशू वर्गवारीत १९,८७२ व्यावसायिकांना ७२,६२ कोटी रुपये कर्ज मंजूर केले. त्यातील ७१.९७ कोटी रुपये वितरित झाले. 'किशोर' वर्गवारीत १७,३६६ व्यावसायिकांना २९३.६७ कोटी रुपये कर्ज मंजूर केले त्यातील २८७.३४ कोटी रुपये वितरित झाले. तर 'तरुण' वर्गवारीत ५२६७ व्यावसायिकांना ४०३.९७ कोटी रुपये कर्ज मंजूर केले. त्यातील ३९७.१४ कोटी रुपये वितरित झाले.