गोव्यात रिवण येथे होणार पुष्पोत्पादन वसाहत, वन खात्याची 200 हेक्टर जमीन करणार संपादित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2017 01:47 PM2017-11-06T13:47:50+5:302017-11-06T13:48:03+5:30
तळेगांव, पुणे येथे असलेल्या पुष्पोत्पादन वसाहतीच्या (फ्लोरिकल्चर इस्टेट) पार्श्वभूमीवर गोव्यात सांगे तालुक्यातील रिवण येथे 200 हेक्टर जमिनीत पुष्पोत्पादन वसाहत होणार आहे.
पणजी - तळेगांव, पुणे येथे असलेल्या पुष्पोत्पादन वसाहतीच्या (फ्लोरिकल्चर इस्टेट) पार्श्वभूमीवर गोव्यात सांगे तालुक्यातील रिवण येथे 200 हेक्टर जमिनीत पुष्पोत्पादन वसाहत होणार आहे. नेहमी स्वैर खाण व्यवसायामुळे धुळीच्या प्रदूषणात गुरफटलेल्या रिवण गावात फुलांची लागवड होणार असल्याने स्थानिकांकडूनही त्याचं स्वागत होत आहे.
ही जमीन सध्या वन खात्याच्या ताब्यात असून ती हस्तांतरित करण्यासाठी येत्या आठवड्यात प्रत्यक्ष प्रक्रिया सुरु होणार आहे. कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी फ्लोरिकल्चर इस्टेटसाठी पुढाकार घेतला आहे. या विषयावर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी त्यांनी चर्चाही केली.
येत्या आठवड्यात प्रत्यक्ष प्रक्रिया सुरु केली जाईल, असे मंत्री सरदेसाई यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितलं. कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी या जमिनीची पाहणी केली व ती फुलांच्या लागवडीसाठी उपयुक्त असल्याचं आढळून आलं. गोव्यात वेगवेगळ्या फुलांचं उत्पादन घेण्यास बराच वाव असल्याचे सरदेसाई म्हणाले. ते पुढे म्हणाले की, तळेगांव, पुणे येथे दीड हजार एकर जमिनीत असाच प्रयोग घेण्यात आला. हॉलंडची ‘डच रोज’ या नावाने प्रसिध्द असलेल्या गुलाबांचे उत्पादन आता पुण्यात घेऊन विमानाने ही गुलाबे हॉलंडलाच निर्यात केली जातात कारण येथील उत्पादन खर्च कमी आहे. अशा पध्दतीचा प्रयोग गोव्यातही करता येईल. येथील हवामानही पुष्पोत्पादनासाठी पोषक आहे. ऑर्किड फुलांची लागवड याठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यासाठी वाव आहे, असंही ते पुढे म्हणाले.
यापुढे पॉलिहाऊसना वेगळी सबसिडी न देता पुष्पोत्पादन वसाहतींमध्ये ठराविक शुल्क आकारुन प्रगत शेतकऱ्यांना भूखंड उपलब्ध करुन देण्यात येतील. या भूखंडांमध्ये त्यांना वीज, पाणी आदी गोष्टींची सोय करुन दिली जाईल तसेच त्यांच्या फुलोत्पादनाला बाजारपेठही मिळवून दिली जाईल. सरदेसाई यांनी अलीकडेच तळेगांव येथील फुलोत्पादन पार्कला भेट देऊन तेथील प्रगत शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे. या शेतकऱ्यांचंही मार्गदर्शन घेतलं जाईल. याआधी केपेंतील शिरवई तसेच अन्य ठिकाणीही फुलोत्पादन वसाहतीसाठी जागा शोधण्याचा प्रयत्न कृषी खात्याने केला होता. रिवण येथील जागेवर आता शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती मिळाली आहे. अशा प्रकारची फ्लोरिकल्चर इस्टेट झाल्यास गोव्यातील ती पहिलीच फुलोत्पादन वसाहत ठरणार आहे.