प्रवाह प्राधिकरणाचे पथक येत्या रविवारी कळसा, भंडुरा प्रकल्पासाठी कर्नाटकने केलेल्या बांधकामाची पाहणी करणार
By किशोर कुबल | Published: July 4, 2024 02:57 PM2024-07-04T14:57:21+5:302024-07-04T14:58:22+5:30
मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्यासाठी ही पाहणी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. सर्व नियम धाब्यावर बसून कर्नाटकने केलेल्या बांधकामासंबंधीचे सत्य प्रवाह प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांसमोर उघड होईल.
पणजी : म्हादई संबंधी प्रवाह प्राधिकरणाचे पथक ७ जुलै रोजी कळसा, भंडुरा प्रकल्पासाठी कर्नाटकने केलेल्या बांधकामाची पाहणी करणार असून कर्नाटकचे पितळ यामुळे उघडे पडेल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्यासाठी ही पाहणी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. सर्व नियम धाब्यावर बसून कर्नाटकने केलेल्या बांधकामासंबंधीचे सत्य प्रवाह प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांसमोर उघड होईल.
मुख्यमंत्री म्हणाले की, म्हादईच्या संरक्षणासाठी आमच्या सततच्या प्रयत्नांचा हा परिणाम आहे. ज्यामुळे आमची बाजू मजबूत होईल आणि कर्नाटकच्या आगाऊपणाबद्दल आजवर जो आम्ही दावा करीत आलो आहोत तो सिद्ध होईल.' हे पथक रविवारी ७ रोजी सकाळी ९.३० वाजता 'प्रवाह'चे अधिकारी हलतरा नाल्यास भेट देतील. त्यानंतर सकाळी ११ वाजता कळसा नाल्याची पाहणी करतील. कोटनी धरण स्थळ व नेर्से येथील भंडुरा नाल्याचीही हे पथक पाहणी करणार आहे. तत्पूर्वी ५ व ६ जुलै रोजी गोव्यात असेल. ८ जुलै रोजी बंगळुरू येथे 'प्रवाह'ची दुसरी बैठक होणार आहे.
म्हादई नदीचे पाणी कर्नाटकने वळवल्याने गोवा व कर्नाटक यांच्यात तंटा सुरू आहे. या प्रश्नी लवादाने दिलेल्या निवाड्याचे योग्य पालन केले जात आहे की नाही, हे तपासण्याचीही 'प्रवाह' प्राधिकरणाची जबाबदारी आहे.