हरित ऊर्जा राज्य बनवण्याकडे लक्ष; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2024 11:51 AM2024-11-09T11:51:57+5:302024-11-09T11:52:21+5:30

'अमेझिंग गोवा जागतिक व्यवसाय'चे उद्घाटन

focus on building a green energy state said cm pramod sawant | हरित ऊर्जा राज्य बनवण्याकडे लक्ष; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

हरित ऊर्जा राज्य बनवण्याकडे लक्ष; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत या व्हिजनला पुढे नेण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहोत. गोवा हे गुंतवणुकीसाठी आणि उद्योगांसाठी भरभराटीचे केंद्र बनत आहे. गोव्याला हरित ऊर्जा राज्य बनवण्यासाठी आमचे सरकार स्वच्छ ऊर्जा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करत आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. 'व्हायब्रेड गोवा फाउंडेशन'तर्फे श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात आयोजित केलेल्या 'अमेझिंग गोवा जागतिक व्यावसाय परिषद' या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री बोलत होते.

व्यासपीठांवर वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, उद्योजक श्रीनिवास धेंपो, व्हायब्रेट गोवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजकुमार कामत, अमेझिंग गोवा जागतिक व्यवसाय परिषदेचे अध्यक्ष विनय वर्मा, फाउंडेशनचे उपाध्यक्ष मनोज पाटील, अरमान बंक्ले आणि रसिक नाईक उपस्थित होते. परिषदेला देश विदेशातील उद्योजकांनी सहभाग घेतला असून यात विविध विषयांवर चर्चा होणार आहे.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, सरकार प्रक्रिया सुलभ करणारी धोरणे राबवून व्यवसायासाठी अनुकूल वातावरण विकसित करण्यासाठी कटिबद्ध आहे. पर्यटन हे उदयोन्मुख उद्योगांचे केंद्र बनणार आहे. सौर, पवन आणि जैवऊर्जा अशा स्वच्छ ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देणाऱ्या धोरणांवर आमचे सरकार लक्ष केंद्रित करत आहे.

गुंतवणूकदारांना आमच्या प्रवासात हरित ऊर्जेचा टप्पा बनण्यासाठी आमंत्रित केले जात आहे. राज्य सरकार पर्यावरणपूरक प्रकल्प आणून उद्योजकाला चालना देण्याचे काम करत आहे. राज्यात औद्योगिक क्षेत्रात मोठी क्रांती केली आहे. अनेक कंपन्या राज्यात गुंतवणूक करण्यात इच्छुक आहेत.

पर्यटनाबरोबर राज्यात आयुर्वेद तसेच मोर्डने आरोग्य क्षेत्रात प्रगती झाली आहे. जागतिक दर्जाच्या शिक्षण संस्था राज्यात आल्या आहेत. उद्योगाबरोबर शिक्षण तसेच क्रीडा क्षेत्रावरही सरकारने भर दिली आहे.

आत्मनिर्भर भारताच्या प्रवासाला गती मिळेल: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी व्हिडीओच्या माध्यमातून संदेश दिला. त्यात त्यांनी व्यवसाय आणि पर्यटनाचे केंद्र म्हणून गोव्याचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित केले. ही परिषद उद्योजक, एमएसएमई आणि उद्योगातील नेत्यांसाठी सहकार्य, नावीन्यपूर्ण आणि जागतिक संधीचा फायदा घेण्यासाठी एक अद्वितीय व्यासपीठ आहे. शिखर परिषद अधिक समृद्ध आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आमच्या सामूहिक प्रवासाला गती देईल. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री सावंत यांसारख्या व्यक्तींकडून मजबूत नेतृत्व आणि निर्णायक सरकार असलेल्या १.४ अब्ज महत्त्वाकांक्षी व्यक्त्ती चांगल्या दर्जाचे जीवन शोधतात, ज्यामुळे वस्तू आणि सेवांची मागणी निर्माण होते, असे ते म्हणाले.

 

Web Title: focus on building a green energy state said cm pramod sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.