फोर्मालीन प्रकरणात कॉंग्रेसची न्यायालयात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 09:39 PM2018-07-23T21:39:19+5:302018-07-23T21:39:21+5:30
न्यायालयीन चौकशीची मागणी
पणजी: फोर्मालीनयुक्त मासळीच्या प्रकरणात कॉंग्रेसचे पणजीतील नेते विनायक कामत तारकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात धाव घेतली आहे. गोव्याबाहेरून येणाºया मासळीवर कायम बंदी घालण्याची आणि फोर्मालीनच्या चाचणी अहवालात फेरफार करण्यासाठी जबाबदार असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाºयांची चौकशी करावी अशी मागणी जनहीत याचिकेत करण्यात आली आहे.
फोर्मालीन प्रकणात सरकारविरुद्ध एकाचवेळी तीन आघाड्यांवर टक्कर देण्याची खेळी कॉंग्रेसकडून खेळण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या मुख्यालयाला घेराव घालणे, विधानसभेचे कामकाज रोखून धरणे या पाठोपाठ आता न्यायालयीन लढाही कॉंग्रेसने छेडला आहे. कामत यांनी या प्रकरणात खंडपीठात धाव घेऊन प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. घाऊक मासळी बाजारात करण्यात आलेली एफडीएच्या चाचणीतही अहवाल फोर्मालीनसाठी पॉझिटीव्ह आला आणि एफडीएच्या प्रयोगशाळेतही केलेल्या चाचणीत फोर्मालीनचे अंश सापडल्याचे दोन्ही अहवाल सांगतात. ह्या गंभीर विषयामुळे लोकात भितीचे वातावरण असल्याचे त्यांनी म्हटलेआहे.
मासळीबाजारात तसेच फळे व भाज्यांच्या बाजारातही एफडीएचे काउन्टर असावेत. या काउन्टरवर मासळी, फळे, भाज्या यांच्या चाचणीची व्यवस्था व्हावी. खुल्या मासळी बाजारात मासळी पोहोचण्यापूर्वीच चाचण्या घेण्यात याव्यात. तसेच गोव्यात मासळीचा होणारा तूटवढा संपविण्यासाठी मासळीच्या निर्यातीवर बंदी घालावी. त्यापूर्वीही मासळी गोव्यात टीकावू पद्धतीने साठवून ठेवण्यासाठी व्यवस्था उभारण्यात यावी असे म्हटले आहे. गोव राज्याचे मुख्य सचीव, अन्न व औषध प्रशासन आणि मच्छीमार खात्याला या प्रकरणात प्रतिवादी करण्यात आले आहे. हे प्रकरण मंगळवारी किंवा बुधवारी सुनावणीला येण्याची शक्यता आहे.