गोव्यात उद्या, परवा पाऊस पडण्याचा अंदाज, गोवेकरांना संकेत उष्म्यापासून दिलाशाचे!
By वासुदेव.पागी | Published: May 11, 2024 07:51 PM2024-05-11T19:51:45+5:302024-05-11T19:52:02+5:30
वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, दोन दिवस 'यलो अलर्ट' जारी
वासुदेव पागी, पणजी: गोव्यात उद्या रविवारी व सोमवारी पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. आकाशात पावसाची ढग तयार होण्याची प्रक्रिया आढळून आली आहे. रविवारी आणि सोमवारी गोव्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यासाठी दोन दिवस पिवळा अलर्टही जारी करण्यात आला आहे. १४ ते १७ मे दरम्यानही या पावसाच्या सरी कोसळणे चालू राहतील असेही अंदाजात म्हटले आहे.
शनिवारी पणजीत कमाल ३४.४ अंश तर किमान २५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती तर मुरगाव येथील कमाल तापमान ३४ अंश व किमान तापमान २६ अंश सेल्सिअस असे राहिले. पुढील ४८ तासात कमाल तापमानात घट होईल असा अंदाज आहे.
गोव्यात तापमान फार वाढत नसले तरी अधीक प्रमाणात सापेक्षिक आद्रतेमुळे उष्म्याचा त्रास अधिक होत आहे. राज्यात १२ ते १७ मे दरम्यान सापेक्ष आर्द्रता ८० ते ९० टक्क्यांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.