हवामान खात्याचा अंदाज अचूकच: डॉ पडगलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 08:34 PM2019-08-17T20:34:14+5:302019-08-17T20:34:35+5:30
हवामान खात्याचा पहिला दीर्घ अंदाज चुकला असे म्हणता येणार नाही.
- वासुदेव पागी
पणजी: गोव्यात यंदा भरपूर पाऊस पडला. संपूर्णपावसाळ््यात नैऋत्यमान्सून गोव्याला सरासरी ११६ इंच एवढा पाऊस देतो. यंदा हे लक्ष्य अवघ्या अडीच महिन्यातच पूर्ण झाले असून इतक्या कमी वेळात इतका प्रचंढ पाऊस अलिकडच्या काही दशकात तरी पडलेला नाही असे हवामान खात्याच्या नोंदी सांगतात. हवेत कायमचा निर्माण झालेला कमी दाब हा या जोरदार व सातत्यपूर्ण पावसाचे कारण आहे. तसेच हवामान खात्याचा पहिला दीर्घ अंदाज चुकला असे म्हणता येणार नाही. अंदाज सारखाच असल्याचे हवामान खात्याच्या पणजी वेधशाळेचे संचालक डॉ कृष्णमूर्ती पडगलवार सांगतात.
प्रश्न: पावसाचे ११६ इंचांचे टार्गेट इतक्या कमी दिवसात पूर्ण होईल असा अंदाज होता?
डॉ पडगलवार: किती दिवसात पावसाचे लक्ष्यपूर्ण होणार याबद्दल अंदाज हवामान खात्यातर्फे केले जात नाहीत, परंतु यंदा गोव्याला भरपूर पाऊस मिळेल असा अंदाज वेधशाळेने जूनमध्येच वर्तविला होता. सामान्य प्रमाणापेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याचे सांगितले होते.
प्रश्न: यंदा भरपूर पाऊस पडण्याचे कारण काय?
डॉ पडगलवार: गोव्याला भरपूर पाऊस मिळण्याची कारणे अनेक आहेत. मुख्य म्हणजे दक्षीण भारतात मान्सून सक्रीय राहिला. अरबी समुद्रात आणि भूभागावरही मान्सूनसाठी अत्यंत पोषक वातावरण राहिले. मान्सूनच्या प्रक्रियेत खंड पडेल असा अडथळाही निर्माण झाला नाही. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे म्हणजे हवेत कमी दाब राहिला. त्यामुळे दाट ट्रग्स निर्माण झाले आणि त्यामुळेच पाऊस आणखी प्रभावी बनला.
प्रश्न: आॅगस्ट महिन्यात १५ दिवसात ३५ इंच पाऊस पडला. ही गती असीच असेल काय?
डॉ पडगलवार: नाही. पुढील पाच दिवस पावसाचा जोर ओसरणार आहे. हलक्या ते मध्यम सरी शक्य आहेत. वेधशाळेने त्यामुळे कोणता इशाराही दिलेला नाही. परंतु त्यानंतर पाऊस पुन्हा एकदा सक्रीय होणार आहे.
प्रश्न: हवामान खात्याच्या मान्सूनच्या पहिल्या दीर्घ अंदाजात ९६ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. हा अंदाज चुकला म्हणावा काय?
डॉ कृष्णमूर्ती: हवामान खात्याचा अंदाज चुकला म्हणता येणार नाही. एक म्हणजे ५ टक्के कमी किंवा अधिक पावसाचा एररही त्यात दाखविण्यात आला होता. तसेच हा अंदाज गोव्यापुरता नसून तो संपूर्ण देशाला मिळणाºया पावसाचा होता.