फॉर्मेलिनप्रश्नी त्या अहवालाच्या सखोल चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 04:21 PM2018-09-22T16:21:14+5:302018-09-22T16:22:39+5:30
आरोग्य खात्याच्या अतिरिक्त सचिवांकडून ही चौकशी होणार आहे.
पणजी : काही महिन्यांपूर्वी सर्वप्रथम जेव्हा अन्न व औषध प्रशासन खात्याच्या (एफडीए) अधिकारी आयवा फर्नांडिस यांनी मडगावला माशांची तपासणी करून माशांमध्ये फॉर्मेलिन रसायन असल्याचा अहवाल दिला होता, त्या अहवालाच्यादृष्टीने पूर्ण विषयाची चौकशी करण्याचे सरकारने ठरवले आहे. आरोग्य खात्याच्या अतिरिक्त सचिवांकडून ही चौकशी होणार आहे.
आरोग्य खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांना पत्रकारांनी शनिवारी आयवा फर्नांडिस यांच्या अहवालाविषयी विचारले. त्यावेळी मंत्री राणे म्हणाले, की माशांमध्ये फॉर्मेलिन नाही एवढे मी सांगू शकतो. गेले काही महिने अनेक चाचण्या केल्या गेल्या. मासळी बाजारातही रोज एफडीएचे अधिकारी जातात व माशांची अगदी शास्त्रोक्त पद्धतीने चाचणी केली जाते. फॉर्मेलिन आढळलेले नाही. एफडीएच्या विद्यमान संचालक ज्योती सरदेसाई यांचाही अहवाल अगदी स्पष्ट आहे. त्यांच्यावर माझा विश्वास आहे.
मंत्री राणे म्हणाले, की आयवा फर्नांडिस यांनी प्रारंभी जो अहवाल दिला, त्याची चौकशी सरकार करून घेईल. आरोग्य खात्याच्या सचिवांनी त्यासाठी माझ्याकडे फाईल पाठवली आहे. अतिरिक्त सचिवांनी चौकशी केल्यानंतर सत्य काय ते बाहेर येईल. योग्य ती कारवाई सरकार करील. गोव्यात जी मासळी येत आहे, त्या मासळीमध्ये फॉर्मेलिन नाही, आम्ही विविध प्रकारे चाचण्या करून घेतल्या आहेत. एफडीएकडे सर्व मासळीवाहू ट्रकांनी स्वत:ची नोंदणी करून घ्यावी, असे आम्ही यापूर्वी सांगितले आहे. आणखी दि. 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली जाईल. तोपर्यंत ट्रकांना नोंदणी करावीच लागेल.
काँग्रेसने चर्चेस यावे
राणे म्हणाले, की माशांमध्ये फॉर्मेलिन आहे असे सांगून काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर आदी गोव्यातील लोकांमध्ये पुन्हा भीती निर्माण करत आहेत. चोडणकर किंवा अन्य काँग्रेस नेत्यांनी चर्चेसाठी यावे असे मी आव्हान देतो. मी खुल्या चर्चेसाठी तयार आहे. गिरीश काही तज्ज्ञ नव्हे. मी त्यांना तुम्ही स्वत: माझ्यासोबत मासळीची तपासणी करण्यासाठी या असेही आव्हान देतो. एफडीएचे अधिकारी तसेच काँग्रेस नेते व आम्ही एकत्र कुठच्याही मासळी बाजारात मासे तपासणीसाठी जाऊया. मी दिल्लीहून तज्ज्ञांना बोलावतो. जाहीरपणे माशांची चाचणी करू द्या. काँग्रेसने उगाच खोटी माहिती देऊन दिशाभूल केली आहे. गोव्याचा पर्यटन उद्योग, बाजारपेठेतील छोटे मासळीविक्रेते, रेस्टॉरंट व्यवसाय हे सगळे विरोधकांच्या राजकारणामुळे उध्वस्त होईल.