Formalin Scare : फोर्मेलिनयुक्त मासळीवरुन गोवा विधानसभेत गदारोळ, कामकाज तहकूब
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 12:17 PM2018-07-19T12:17:25+5:302018-07-19T12:22:26+5:30
गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फोर्मेलिनयुक्त मासळीच्या मुद्यावरुन विरोधकांनी सभागृहात गदारोळ केला.
पणजी - गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फोर्मेलिनयुक्त मासळीच्या मुद्यावरुन विरोधकांनी सभागृहात गदारोळ केला. यामुळे सभापतींना दुपारी 12 वाजेपर्यंत कामकाज तहकूब करावे लागले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रश्नोत्तराचा तास सुरू होण्यापूर्वीच विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी फोर्मेलिनच्या मुद्यावर कामकाज तहकूब करण्याची मागणी केली. काँग्रेसच्या 16 आमदारांच्या स्वाक्षरीने तसे निवेदन दिलेले असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु सभापती प्रमोद सावंत यांनी यास नकार दिला.
फोर्मेलिनच्या मुद्यावर काँग्रेसचेच आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी केलेले लक्ष्यवेधी सूचना यावेळी सभागृहात आणली जाईल, असे सांगितले. सभापतीचे काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत विरोधक नव्हते. आलेक्स रेजिनाल्ड व इतर आमदारांनीही उभे राहून कामकाज तहकूब करण्याची मागणी केली.
आमदार लुईझईन फालेरो यांनी तर घटनेची कलमे सांगून ही तहकूबी किती कायदेशीर आहे हे सभागृहाला सांगितले.
राष्ट्रगीत सुरू होवून प्रश्नोत्तराच्या तासाच्या पहिल्याच मिनिटाला सभागृहात गदारोळ सुरू झाला. काँग्रेसचे सर्व 16 पैकी 16 आमदार आपल्या आसनावरून उठून उभे होते आणि कामकाज तहकूब करण्याची जोरदार मागणी करीत होते. पाचव्या मिनिटाला सर्व आमदार सभापतीच्या आसनासमोर जाण्यासाठी निघाले आणि ते तिथे पोहोचण्यापूर्वीच कामकाज 12 वाजेपर्यंत म्हणजे 14 मिनिटांसाठी तहकूब केल्याचे सभापतीने जाहीर केले.