...त्यामुळे 'बाशिंग' वाले वाढले; भाजपमध्ये नेत्यांकडून दुर्लक्ष झाल्याचा पार्सेकरांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 03:02 PM2023-12-15T15:02:12+5:302023-12-15T15:02:22+5:30

आगामी लोकसभा निवडणुकीत आपली भूमिका काय असेल?

former cm laxmikant parsekar complains about being neglected by leaders in bjp | ...त्यामुळे 'बाशिंग' वाले वाढले; भाजपमध्ये नेत्यांकडून दुर्लक्ष झाल्याचा पार्सेकरांचा टोला

...त्यामुळे 'बाशिंग' वाले वाढले; भाजपमध्ये नेत्यांकडून दुर्लक्ष झाल्याचा पार्सेकरांचा टोला

लोकमत न्यूज नेटवर्क, हरमल : भाजपमध्ये सध्या अनेक जण बाशिंग बांधून तयार असल्याचे चित्र आहे. आपल्याला विधानसभा, लोकसभा किंवा अन्य निवडणुकांत उमेदवारी मिळावी, असा त्यांचा आग्रह आहे. अशा अतृप्त आत्म्यांना शांत करण्यासाठी पक्षात योग्य माणसे नाहीत, किंबहुना प्रत्येक जण आपापल्या व्यापात गुंतले आहेत, याची खंत वाटते. यासाठीच शून्यातून पक्षाची उभारणी केली होती का? असा सवाल माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीसाठी मी यत्किंचितही विचार करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आगामी लोकसभा निवडणुकीत आपली भूमिका काय असेल? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता पार्सेकर म्हणाले की, 'भाजपला मी नको होतो, म्हणून पक्ष सोडून बाहेर पडलो. पक्षाने माझे अवमूल्यन केले होते. मी पक्षावर नाराज नसून, पक्ष चालविणाऱ्या व्यक्तींकडून हेतुपुरस्सर हा निर्णय घेतला गेला. त्यामुळे मी नाराज झालो होते. आता पक्षाकडून ऑफर आल्यास मी अवश्य विचार करेन.'

पार्सेकर म्हणाले की, 'काही जण मी ज्येष्ठ झाल्याचे सांगतात. मात्र, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रांत मी कार्यरत आहे, कार्यक्षम आहे. मी आपली बुद्धी आणि आरोग्य शाबूत ठेवले आहे. लोकसभेसाठी मी इच्छुक नाही. राज्यातच, गोमंतकीय जनतेसाठी कार्य करण्याचे माझे प्रयत्न आहेत.'

पार्सेकर म्हणाले की, 'भाजप रुजवण्यात आम्ही अवघ्या नेत्यांसोबत काम केले. पक्ष वाढला. मोठा झाला. मात्र, गेल्या निवडणुकीत पक्षाने 'निवडून येण्याची क्षमता' हा निकष लावला. त्यामुळे त्यावेळी योग्य निर्णय घेण्याची वेळ आली. पक्षाने अन्याय केल्याची चीड होती. खुमखुमी झाली व मी निवडणुकीस सामोरे गेलो. निवडणुकीसाठी माझ्याकडे कोट्यवधी रुपये नव्हते किंवा भाजपच्या उमेदवाराचा पराभव करणे हा मुद्दा नव्हता. मला किती लोकांचे समर्थन आहे, याचे उत्तर देऊ शकलो. जिंकणे या निकषाला प्रत्युत्तर दिले याचे समाधान वाटते.'

ऑफर धुडकावल्या...

'गेल्या निवडणुकीत माझ्यामुळे भाजपाचा उमेदवार पडला याचे दुःख आहे. मात्र, पक्षाच्या धुरिणांनी चुकीचा निर्णय घेतला होता. पक्ष रुजवणारी व्यक्ती असताना मला डावलले याचे दुःख आहे. मी भाजप सोडला. त्याचवेळी आलेल्या मोठमोठ्या ऑफर धुडकावून लावल्या होत्या, असेही पार्सेकर म्हणाले.

ती मला संधी आत्मपरीक्षणाची

पार्सेकर म्हणाले की, 'मुख्यमंत्री पदावर असताना, २०१७ च्या निवडणुकीत मी पराभव चाखला. त्याची कारणे मी त्यावेळी सांगितली होती. आता पुन्हा तसे घडणार नाही. त्या पराभवामुळे आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळाली, पुन्हा निवडून आल्यावरच मनाला संतुष्टी मिळेल.

भाऊ सज्जन व्यक्ती

'आता लोकसभा निवडणुका तोंडावर आहे. केंद्रीय मंत्री श्रीपादभाऊ नाईक ही राजकारणातील सज्जन व्यक्ती आहे. त्यांनी कसलेही गैरकृत्य केलेले नाही. चांगली व्यक्ती निवडून यायला हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी पाच वर्षे पंतप्रधानपद भूषवावे, असे माझे मत आहे,' असे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले.
 

Web Title: former cm laxmikant parsekar complains about being neglected by leaders in bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.